नवी दिल्ली, २८ जुलै २०२३ : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. ते आज येथे ‘सेमिकॉन इंडिया २०२३’ परिषदेचे उद्घाटन करतील. गांधीनगर येथे ही परिषद होणार आहे. त्याचबरोबर देशातील आणि जगातील सेमीकंडक्टर क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ ३ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या परिषदेत मायक्रोन, फॉक्सकॉन, वेदांता यांसारख्या कंपन्यांचे सीईओ चेअरमन सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की, भारताच्या सेमीकंडक्टर मिशनला पुढे नेणे हा त्यांचा उद्देश आहे.
आज शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सेमिकॉन इंडिया २०२३’ कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. त्याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आयटी व्यवहार मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय मायक्रोनचे सीईओ संजय मेहरोत्रा, फॉक्सकॉनचे अध्यक्ष युन ली, कॅडेन्सचे सीईओ अनिरुद्ध देवगण, वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचा समावेश असेल. हा उपक्रम ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉन, मायक्रोन, एएमडी, आयबीएम, मार्वेल, वेदांत, लॅम रिसर्च, एनएक्सपी टेक्नॉलॉजीज, इन्फिनॉन टेक्नॉलॉजीज, अप्लाइड मटेरियल्स आणि क्षेत्रातील इतर मोठ्या कंपन्या या विशेष कार्यक्रमाचा भाग असतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड