शिर्केवाडी वाटद-मिरवणे येथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी, ११ मार्च २०२३ : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (ता.१०) शिर्केवाडी, वाटद-मिरवणे येथे मोठ्या उत्साहात झाला.

यावेळी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव, अध्यक्ष मराठा विकास मित्रमंडळ, पुणे हरिश्चंद्र सावंत, अध्यक्ष, वरवडे पंचक्रोशी शिक्षणप्रसारक मंडळाचे नानासाहेब विचारे, अविनाश पाले, नारायण शिर्के, आबासाहेब सुर्वे, आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन आपल्या हस्ते होणे, हा आपल्या आयुष्यातील सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा हा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेकाला ३५० वर्षे होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविण्यासाठी ३५० कोटींची तरतूद कालच सरकारने अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी त्यांनी दिली; तसेच या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपये एवढा निधी आमदार निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

श्री. सामंत म्हणाले, की आपण पालकमंत्री झाल्यानंतर मारुती मंदीर येथे शिवसृष्टी साकारण्यात आली. ती बघण्यासाठी महाराष्ट्रातील लोक येथे येतात. रत्नदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्रातील सर्वांत चांगली शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पुढच्या एक वर्षात होणार आहे. महाराष्ट्राची शान असेल, असा सर्वांत मोठा जिजाऊंचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा रत्नागिरी येथे पुढील एक वर्षात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांपर्यंत पोचावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरचे सर्वांत मोठे ग्रंथालय आणि संशोधन केंद्र हे रत्नागिरी येथे होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपत असताना त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात होणे गरजेचे आहे आणि त्याची सुरवात आपल्या जिल्ह्यातून झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागळापर्यंत पोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा