शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याचे दोन्ही पाया अधू, यूपी मधील शामली येथील घटना

शामली, ८ सप्टेंबर २०२२ : देश पातळीवर शासन स्तरावर, शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थी पटसंख्या वाढण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. परंतु उत्तर प्रदेश मधील शामली येथे एक विद्यार्थी, उशिरा आल्याच्या कारणावरून शाळेच्या मुख्याध्यापकाकडून त्या विद्यार्थ्याला अघोरी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये विद्यार्थ्याचे दोन्ही पाय अधू (फ्रॅक्चर) झाले आहेत.

उत्तर प्रदेश मधील शामली येथे आदर्श मंडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील जयजवान जयकिसान इंटर कॉलेजमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला पाच मिनिट शाळेत यायला उशीर झाला म्हणून बेदम मारहाण केली आहे.

मागील काही दिवसांपासून हा विद्यार्थी आजारी होता. त्याच्यावरती उपचार करून त्याला बरे वाटू लागल्यानंतर, त्याने शाळेत यायला सुरुवात केली होती. परंतु फक्त पाच मिनिट उशीर झाल्याने मुख्याध्यापकांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या पीडित विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे.

सदर घटना घडल्यानंतर त्याच्या वडिलांनी मुलाला, उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले. उपचार करताना त्याच्या दोन्ही पायाचे एक्स-रे काढण्यात आले. यातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या या मुलावर उपचार सुरू असून त्याच्या दोन्ही पायांना प्लास्टर करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा