दैव बलवत्तर म्हणून पुराच्या पाण्यातून मामा भाच्याचे वाचले प्राण वर्धा जिल्ह्यातील घटना

12

वर्धा १२ सप्टेंबर २०२२ : गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलेले पहावयास मिळत आहे. काही जिल्ह्यात तर अतिवृष्टीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. नद्या, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच वर्धा जिल्ह्याला ही मुसळधार पावसाने झोडपले आहे. याच मुसळधार पावसामुळे कारंजा (घाडगे) तालुक्यातील खडक नदीला पूर आला आहे.या पुराच्या पाण्यातून वाट काढताना मामा भाचा दुचाकीसह, पाण्यात पडल्याची घटना समोर आली आहे.

मुसळधार पावसानंतर नदीला आलेल्या पुरातून वाट काढत असताना मामा भाचे पाण्यात पडले. यानंतर पाण्याच्या प्रवाहा बरोबर दोघेही पुरात वाहून जाऊ लागले. परंतु दैव बलवत्तर असल्यामुळे सुदैवाने एका झाडामुळे त्यांचा जीव वाचला. हे दोघेही वाहून जात असताना मध्ये आलेल्या झाडाला पकडून त्यांनी झाडावर आसरा घेतला. त्यामुळे दोघेही या भयंकर प्रसंगातून थोडक्यात बचावले. दोघांनाही महसूल विभाग, पोलीस यंत्रणा आणि स्थानिकांच्या मदतीने काही तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले.

दरम्यान वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये ठीक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. कारंजा तालुक्यातही वीज पडण्याच्या दोन घटनां घडल्या आहेत. यामध्ये दोन ठिकाणी जनावरे दगावली आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर