आयात शुल्कात वाढ, देशांतर्गत किमतीवर होणार परिणाम

46

पुणे, १७ डिसेंबर २०२२ : महागाईपासून दिलासा मिळत असतानाच पुन्हा भारतीय बाजारात खाद्यतेल आणि सोन्या-चांदीच्या किमती लवकरच वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली आहे. जागतिक बाजारपेठेतील सतत वाढत असलेल्या किमती लक्षात घेऊन सरकारने सोने-चांदी, कच्चे पामतेल आणि सोया तेलाच्या आधारभूत आयात किमतींत वाढ केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारातील त्यांच्या किमतींवरही परिणाम होणार आहे.

दर १५ दिवसांनी केंद्र सरकारकडून खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या आधारभूत आयात किमतींत बदल केला जातो. या किमती आयातदारांकडून आकारल्या जाणाऱ्या कराची गणना करण्यासाठी वापरल्या जातात. भारत हा खाद्यतेल आणि चांदीचा जगातील सर्वांत मोठा आयातदार आणि सोन्याचा दुसरा सर्वांत मोठा ग्राहक आहे.

कच्च्या पामतेलाची मूळ आयात किंमत ९७७ डॉलर प्रतिटन इतकी वाढवण्यात आली आहे, तर आधी ती ९७१ डॉलर होती. आरबीडी पामतेलाची मूळ आयात किंमत ९७७ डॉलरवरून ९७९ डॉलर प्रतिटन करण्यात आली आहे. याचबरोबर आरबीडी पॉमोलिनची मूळ आयात किंमत ९९३ डॉलरवरून कमी करून ९८८ डॉलर प्रतिटन करण्यात आली आहे; तसेच कच्च्या सोया तेलाची आधारभूत किंमत १,३६० डॉलरवरून कमी करून १,२७५ डॉलर प्रतिटन इतकी करण्यात आली आहे. सोन्याची मूळ आयात किंमत ५६५ डॉलरवरून वाढ होऊन ५८८ डॉलर प्रति १० ग्रॅम आणि चांदीची मूळ आयात ६९९ डॉलरवरून वाढ होऊन ७७१ डॉलर प्रतिकिलो करण्यात आली आहे.

दर पंधरवड्याला घेतला जातो आढावा
जागतिक बाजारात पामतेल आणि सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत असताना भारतीय आयातदारांवरही परिणाम होतो. देशांतर्गत बाजारातील किमती जागतिक बाजाराशी सुसंगत ठेवण्यासाठी सरकार दर पंधरवड्याला आधारभूत आयात मूल्याचा आढावा घेण्यात येतो. मूळ आयात किंमत हा दर असतो, की ज्याच्या आधारावर सरकार व्यापाऱ्यांकडून आयात शुल्क आणि कर आकारते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा