राष्ट्रीय बचत योजनांच्या व्याजदरात वाढ; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच गुंतवणूकदारांना गिफ्ट

नवी दिल्ली, ३१ डिसेंबर २०२२ : केंद्र सरकारने देशभरातील नागरिकांना शुक्रवारी (ता. ३० डिसेंबर २०२२) नव्या वर्षाचे गिफ्ट दिले आहे. एनएससी, पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘पीपीएफ’च्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. एक जानेवारी २०२३ पासून नवीन व्याजदर लागू होतील. आज अर्थमंत्रालयाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना, एनएससी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजना यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना खूशखबर मिळाली आहे. अर्थ मंत्रालयाने २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्चपर्यंत वरील बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. ‘पीपीएफ’ आणि सुकन्या समृद्धी योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ‘पीपीएफ’ व सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर पाच टक्के कायम ठेवला आहे. करपात्र उत्पन्न असणाऱ्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), ज्येष्ठ नागरिक बचत योजना व किसान विकास पत्र (केव्हीपी) यावरील व्याजदर १.१ टक्क्यांनी वाढविला आहे. पोस्टातील एक वर्षांच्या ठेवींवर ६.६ टक्के, दोन वर्षांच्या ठेवींवर ६.८ टक्के, ३ वर्षांच्या ठेवींवर ६.९ टक्के, तर ५ वर्षांच्या ठेवींवर ७% व्याज मिळेल.

मासिक उत्पन्न योजनेच्या व्याजदरात ४० बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. या योजनेचा व्याजदर आता ७.१ टक्के असेल. तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांचा व्याजदर २० बेसिस पॉइंटने वाढवून ७ टक्के करण्यात आला आहे.

अल्पबचत योजनांवरील व्याजदर पुढीलप्रमाणे- (योजना, आधीचा दर, कंसामध्ये नवा दर)
बचत ठेव : ४.०% (४.०%), १ वर्षाची ठेव : ५.५% (६.६%), २ वर्षांची ठेव : ५.७% (६.८%), ३ वर्षांची ठेव : ५.८% (६.९%), ५ वर्षांची ठेव : ६.७% (७.०%), ५ वर्षांची आवर्ती ठेव : ५.८% (५.८%), ज्येष्ठांची बचत योजना : ७.६% (८.०%), मासिक उत्पन्न योजना : ६.७% (७.१%), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र : ६.८% (७.०%), पीपीएफ ७.१% (७.१%), सुकन्या समृद्धी योजना : ७.६% (७.६%), किसान विकास पत्र : ७.०%
(१२३ महिने), ७.२% (१२० महिने).

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा