खुला व मागासप्रवर्ग यांची घेतलेली वाढीव फी त्वरित परत करावी: मनसे

बारामती, दि. १८ जुलै २०२०: राज्यात कोरोना संसर्गाने मार्च महिन्यापासून बाजारपेठ, व्यवसाय, उद्योग सर्व बंद आहेत शासनाने प्रत्येक शहरातील अनेक महाविद्यालयांच्या इमारती व वसतिगृहे कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठी सरकारनेच ताब्यात घेतले आहेत.या परिस्थितीत महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होतील याची कोणतीही शाश्वती नसताना मात्र पुणे विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांनी फी वसूली करण्यास सुरुवात केली असून खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून निर्धारीत केलेल्या फी पेक्षा वाढीव फी महाविद्यालयांनी वसूल करण्यास सुरु केल्याने या अशा महाविद्यालयांवर सामाजिक न्याय विभागाने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, विभागाच्या सचिवांकडे मनसेचे बारामती शहराध्यक्ष ऍड निलेश वाबळे यांनी केली आहे.

राज्यात सध्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील कामे ठप्प झाली आहेत. कोरोना सारख्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे तर फारच नुकसान होत आहे. तर अनेक ठिकाणी शाळा- महाविद्यालयांचे कोविड केंद्रात रूपांतर झाले आहे. रखडलेल्या परीक्षा, अर्धवट झालेले अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे निकाल, या सर्वच विषयांवर भ्रम असताना नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच अनेक शाळा- महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना फी आकारण्यास सुरवात केली आहे.

पुणे विद्यापीठाने २०११ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळणे गरजेचे आहे. परंतु अनेक महाविद्यालयानी सन २००८-o९ ते आजपर्यंत खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून वाढीव फी आकारली आहे. मुळात सवलत मिळण्याचा हक्क असताना देखील ते भरमसाठ फी भरत आहेत.

या गंभीर विषयाकडे लक्ष ।देता, पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे ऑडिट करून खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून घेण्यात आलेले वाढीव शुल्क त्वरित त्यांना परत करावे व संबंधित महाविद्यालयावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. या मागणीचे निवेदन मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे , मा. सचिव सामाजिक न्याय विभाग तसेच आयुक्त समाजकल्याण पुणे यांना मेलद्वारे पाठवले आहे.

सदर निवेदनाची दखल न घेतल्यास मनसेच्या वतीने विविध विद्यार्थी संघटना व विद्यार्थी मार्फत विद्यापीठांतून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेचे बारामती अध्यक्ष अॅड निलेश वाबळे व सामाजिक कार्यकर्ता अमर एकाड यांनी दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा