मुंबई, १२ मे २०२१: राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने दिलासाजनक स्थिती आहे, मात्र कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकोरमायकोसिसचा धोका वाढत असल्याने वैद्यकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. म्युकोरमायकोसिस मुळे आता मृत्यू होण्याच्या घटना देखील समोर येत आहे. म्युकरमायकोसीसमुळे कल्याण डोंबिवलीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीत राहणारे बाजीराव काटकर आणि कल्याण ग्रामीण येथील महारण परिसरात राहणारे तुकाराम भोईर यांचा समावेश आहे.
या दोघांचा उपचार डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णालयात सुरु होते. या रुग्णालयात या व्यतिरिक्त सहा रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशी माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात म्युकोरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत २०० वर गेली असून यामुळे आतापर्यंत दहापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काय आहे म्युकोरमायकोसिस
राज्यात म्युकोरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढत आहे. याला ब्लॅक फंगस असेही म्हणतात. राज्यात जे कोविड रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, त्यांच्यात ऑक्सिजनमुळे आर्द्रता निर्माण होते, परिणामी या रुग्णांना म्युकोरमायकोसिसची लागण होण्याची शक्यता अधिक अधिक असते. काेराेनामुक्त मधुमेहींना याचा धाेका अधिक असताे. म्युकोरमायकोसिस आजार पूर्वीपासून अस्तित्वात आहे; मात्र कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीमुळे याची लागण हाेत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे