विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातून पैसे काढण्यावर वाढतोय जोर

मुंबई, १४ सप्टेंबर २०२०: सप्टेंबरमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचं (एफपीआय) विक्रीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. त्यांनी आतापर्यंत २,०३८ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केलीय. वास्तविक, भारत-चीन सीमेवर तणाव आणि जागतिक आर्थिक कमकुवतेमुळं व्यापारी चिंतेत आहेत.

डिपॉझिटरीजच्या ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी १ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत शेअर बाजारातून ३,५१० कोटी रुपयांची निव्वळ रक्कम काढून घेतली, तर बाँड मार्केटमध्ये १,४७२ कोटींची निव्वळ गुंतवणूक केली. अशा प्रकारे भारतीय बाजारात त्यांची निव्वळ विक्री २,०३८ कोटी रुपये आहे.

यापूर्वी जून ते ऑगस्ट दरम्यान एफपीआयनं नेट खरेदी केली होती. ऑगस्टमध्ये त्यांनी ४६,५३२ कोटी रुपये, जुलैमध्ये ३,३०१ कोटी आणि जूनमध्ये २४,०५३ कोटींची गुंतवणूक केली होती.

मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर (मॅनेजमेंट रिसर्च) हिमांशु श्रीवास्तव म्हणाले की, “सप्टेंबरच्या सुरूवातीपासूनच एफपीआयनं भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सावधगिरी अवलंबली आहे.” ते म्हणाले की, “जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या घसरणीनं गुंतवणूकदारांच्या विचार सरणीवर परिणाम झाला आहे.”

श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, कमकुवत जागतिक कल आणि भारत-चीन यांच्यात सीमेवर वाढता तणाव यामुळं गुंतवणूकदारांनी बाजारापासून दूर राहणं चांगलं मानलंय. त्यांच्या मते नुकत्याच झालेल्या तेजीनंतर प्रॉफिट बुकिंगला पसंती देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा