इंदापूर, ३० जानेवारी २०२१: २६ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी व अवैद्य धंदे बंद करावेत या मागण्यांसाठी भिमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज पोळ यांनी २६ जानेवारी २०२१ पासून इंदापूर पोलिस स्टेशन समोर कुटुंबासह आमरण उपोषण प्रारंभले होते. प्रभारी पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यामुळे आंदोलनकर्ते युवराज पोळ यांनी आज चौथ्या दिवशी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
आज शनिवार दि.३० जानेवारी रोजी भिमशक्ती संघटनेच्या वतीने इंदापूर बंद चे आवाहन करण्यात आले होते. इंदापूर बंद ला समिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान इंदापूर पोलिस स्टेशन समोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी तात्काळ पोलिस अधिकारी व कर्मचारी आल्यामुळे रास्ता रोको झाला नाही.
या संदर्भात प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता गोडसे म्हणाले,२०१७ मधील प्रकरण असल्याने पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. म्हणून न्यायालयातून कागदपत्रे घेऊन या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात येईल. आंदोलनकर्त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या कडून समाधान कारक उत्तर मिळाल्याने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित जाधव यांच्या हस्ते आंदोलक युवराज पोळ यांना सरबत देऊन आंदोलन सोडण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे