इंदापूर तालुक्यात सत्तर टक्के द्राक्षाचे नुकसान

इंदापूर : जीवाचे रान करत जोपासलेली डाळिंब, द्राक्षाची सत्तर टक्के शेती यंदाच्या लांबलेल्या परतीच्या पावसाने अक्षरशः ओरबाडून नेली. तथापि हाताशी लागलेले द्राक्षाचे पिक निर्यातक्षम दर्जाचे निघाले.
सोनमाथ्यावर शेती असणाऱ्या इंदापूरच्या सुनिल तळेकर नावाच्या तरुण शेतकऱ्याला ‘एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू’ असा हा अनुभव निसर्गाने दिला आहे.
मात्र मुरमाड जमिन कसताना त्या जमिनीवर देखील आपण निर्यातक्षम उत्पादन घेेेेवू शकतो असा आत्मविश्वास या नुकसानदायक अनुभवाने तळेकर यांच्यात निर्माण केला आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेतील
….’मोडून पडला संसार,
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन,
फक्‍त लढ म्हणा’….या ओळींचे सार या अनुभवाने तळेकर यांच्या गाठीशी बांधले आहे.
सविस्तर हकीकत अशी की, सोनमाथ्यावर तळेकर यांचे वडील तुकाराम तळेकर यांची २१ एकर जमिन आहे. आजुबाजूला वनखात्याचे क्षेत्र आहे. जमिन मुरमाड असल्याने ती पडीकच होती. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर सुनिल तळेकर यांनी एकूण जमिनीपैकी दहा एक जमिन वहिवाटीत आणण्याचा निर्णय घेतला.
हा भाग उंचावर आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे अनेकांनी जमिन कसण्याच्या फंदात पडू नको असा अनाहूत सल्ला ही तळेकरांना दिला होता. मात्र वडीलांनी घेतलेली जमिन आहे. ती कसण्याचे वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने सन २०१६ मध्ये आपला उपजिवीकेचा दुसरा व्यवसाय बंद करुन पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय तळेकरांनी घेतला. अथक परिश्रमाने मुरमाड जमिन कसण्यायोग्य केली. चार किलोमीटर दूर विहिर खोदली. शेतात एक लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. विहिरीतील पाणी जलवाहिनीद्वारे तळ्यात आणले.
सन २०१७ मध्ये कृषितज्ज्ञ राजेंद्र वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच एकर रंगीत द्राक्षे व सहा एकर डाळिंबाची लागवड केली. त्यावर्षी दुष्काळामुळे पिक हाती लागले नाही. त्यामुळे हिंमत न हारता यंदा पुन्हा मेहनत घेतली. मात्र परतीच्या पावसाच्या दणक्याने झालेल्या फुलगळीमुळे फळधारणा झाली नाही. डाळिंबाचे पिक हातातून गेले. द्राक्षपिकावर उमेद होती.परंतु सुमारे सत्तर टक्के द्राक्ष पिकाचे पावसाने नुकसान झाले.
कृषीतज्ज्ञ राजेंद्र वाघमोडे यांचे मार्गदर्शन व तळेकर यांचे परिश्रम यामुळे जेवढे द्राक्षपिक हाती लागले ते निर्यातक्षम होते हीच वाईटातील चांगली बाब होती. नाशिक येथील फळांचे निर्यातदार मनवेश चेंचानी यांनी चायनातील द्राक्षाचे व्यापारी गेव्हीन यांच्या समवेत तळेकर यांच्या द्राक्षशेतीस भेट देवून पाहणी केली. तथापि सन २०१६ पासून सतत अपयश पचवल्यानंतर कमी प्रमाणात का होईना यशस्वी झालेल्या आपल्या शेतीमाल आपल्या भागातच विकला जावा. या आंतरिक इच्छेतून तळेकर यांनी ही द्राक्षे राज्यातीलच व्यापाऱ्यां ना दिली.
याबाबत “न्युज अनकट” शी बोलताना तळेकर म्हणाले की, आजच्या काळात शेती करणे बेभरवश्याचे आहे. असे अनेक जण म्हणत होते. मात्र आपण पुर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. जमिन कसण्यायोग्य करण्याकरता व त्यानंतर लागवड, खते, औषधे यासाठी अमाप पैसा खर्च झाला.डोक्यावर कर्ज झाले आहे. ते कसे ही फेडता येईल. पण अपयशातील यशाने आपण हाती घेतलेले काम पूर्ण करु शकतो असा आत्मविश्वास दिला आहे. आत्ता यशासाठी लढायचे आहे.’

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा