भारत आणि चीन दरम्यान सलग १४ तासांची चर्चा, सैन्य मागं घेण्याबाबत असहमतीच

लडाख, २३ सप्टेंबर २०२०: भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्सनी सोमवारी पूर्वेकडील लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) तणावपूर्ण परिस्थितीत सलग १४ तास दीर्घ चर्चा झाली. चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांमधील हा सहावा लष्करी संवाद होता आणि त्याचा परिणाम मागील पाच बैठकींप्रमाणेच होता. म्हणजेच दोन्ही बाजू आपापल्या बाजूवर ठाम आहेत. १० सप्टेंबर २०२० रोजी मॉस्को येथे उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील चर्चेत सहमतीनुसार पावलं उचलण्याची मागणी भारत करीत असताना चिनी पक्ष सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी भारतावर लादण्याचा प्रयत्न करतोय. तथापि, दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं.

मागील बैठकीनंतर घडल्याप्रमाणे या वेळी देखील अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं असून सैन्य माघार घेण्याबाबत एकमत होण्यास वेळ लागू शकेल, असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. मॉस्को येथे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या पाच मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतर ही पहिली लष्करी बैठक होती. चुशुल-मोल्दो येथे झालेल्या या बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाचा एक वरिष्ठ अधिकारीही यात सहभागी होता.

सूत्रांनी सांगितलं की, सैन्यदलाच्या पूर्ण माघार घेण्याबाबत दोन्ही बाजू सहमत आहेत पण, त्याची अंमलबजावणी कशी करावी यावर चर्चा सुरूच आहे.

दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये आत्तापर्यंत ५ वेळा चर्चा

अशा लष्करी चर्चे व्यतिरिक्त दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये पाच वेळा चर्चा झाल्या आहेत. याखेरीज संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्यातही बैठक झाली असून सैन्य मागं घेण्याबाबतही एक करार झाला आहे. असं असूनही, परिस्थिती तणावपूर्ण आहे. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी एलएसीवरील पँगोंग तलावाच्या दक्षिणेकडील भागात दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये चकमक झाली. त्यानंतर कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही परंतु, दोन्ही बाजूंकडून लष्करी तयारी आता शिगेला आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा