नवी दिल्ली, 1 जानेवारी 2022: संरक्षण निर्यात वाढवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढाकारातून देशाला लवकरच एक मोठे यश मिळू शकते. भारत सरकार आणि फिलीपिन्स यांच्यातील ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांच्या निर्यात करारावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले की, ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या विक्रीसाठी भारत आणि फिलीपिन्स यांच्यात वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलिपिन्स लवकरच या क्षेपणास्त्रांच्या खरेदीची ऑर्डर देऊ शकतो.
इतर देशांमधून खरेदी ऑर्डर देखील लवकरच प्राप्त होऊ शकतात
सूत्रांचे म्हणणे आहे की डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) आणि ब्रह्मोस एरोस्पेस हे क्षेपणास्त्र मित्र देशांना निर्यात करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. डीआरडीओने नुकताच मेड इन इंडिया रडारसाठी अमेरिकेसोबत करार केला होता.
भारताला इतर मित्र देशांकडून क्षेपणास्त्र प्रणालीसाठी ऑर्डर लवकरच मिळतील अशी अपेक्षा आहे कारण इतर काही देशांसोबतही वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. या क्षेपणास्त्राची क्षमता वाढली असून ते अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे