पहिल्या टी-२० मध्ये भारताने आयर्लंडचा २ धावांनी केला पराभव

डबलीन, १९ ऑगस्ट २०२३ : भारताने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीच्या जोरावर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पावसामुळे व्यत्यय आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडचा डकवर्थ लुईस नियमानुसार पराभव केला. दुखापतीनंतर जवळपास वर्षभरानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या बुमराहने २४ धावांत दोन विकेट्स घेतल्या, तर पहिला टी-२० सामना खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने ३२ धावांत दोन विकेट्स घेतले. आठव्या क्रमांकाचा फलंदाज बॅरी मॅकार्थीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आयर्लंडने सात बाद १३९ धावा केल्या. मॅककार्थीने ३३ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावांची खेळी केली.

भारतीय कर्णधार बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ११ व्या षटकात आयर्लंडने ५९ धावांत ६ विकेट गमावल्या होत्या पण त्यानंतर कुर्टिस कॅम्पफर (३९) आणि मॅककार्थी यांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर अर्शदीपला षटकार ठोकून मॅकार्थीने पहिले अर्धशतक पूर्ण केले. विजयासाठी १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल (२३ चेंडूत २४) आणि रुतुराज गायकवाड (नाबाद १९) यांनी भारतासाठी ६.२ षटकांत ४६ धावा जोडल्या. मात्र, यानंतर आलेल्या संजू सॅमसनने आल्या आल्या एक धाव करत भारताला ४७ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर पावसाला सुरूवात झाली.

आधी क्रेग यंगने जैस्वाल आणि तिलक वर्मा (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताला दुहेरी धक्का दिला. मात्र त्यानंतर पावसाला सुरूवात झाली. खेळ थांबला त्यावेळी भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयासाठी ६.५ षटकात ४५ धावा करणे गरजेचे होते. भारताच्या त्यावेळी ४७ धावा झाल्या होत्या. अखेर पावसाने काही उसंत दिली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारताला विजयी घोषित करण्यात आले. आणि सामनावीराचा पुरस्कार हा कर्णधार जसप्रीत बुमराहला मिळाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा