पुणे, १९ ऑगस्ट २०२३ : बऱ्याच दिवसाच्या विश्रांती नंतर राज्यात पाऊस परतणार आहे. अधिक मासानंतर श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने दडी मारली होती. आता राज्यात श्रावण सरी आता सुरु होणार आहे. विदर्भातील अनेक भागांत काल पाऊस सुरु झाला आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी काल पाऊस झाला. आता २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे चिंतेत असणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
शनिवारपासून कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली,नागपूर,भंडारा,गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि जळगावला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात देखील हवामान खात्याकडून यलो अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
विदर्भात अमरावती, वर्धा, नागपूरसह जवळपास सर्व जिल्ह्यात मुसळधार जलधारा बरसणार आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर मध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात पाऊस नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता निर्माण झाली आहे. परंतु आता हवामान विभागाकडून आशादायक अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारीही सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला यलो अलर्टचा अंदाज दिला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे.त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर










































