नवी दिल्ली, दि. ३० जून २०२०: भारत आणि चीन यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सीमा विवादामध्ये दिवसेंदिवस नवीन घडामोडी समोर येत आहेत. भारत सरकार सातत्याने परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु चीनच्या रोज नवीन कुरापती समोर येत आहेत. अशा परिस्थितीत भारताने चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी देखील सुरू केली आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० रणगाडे तैनात केले आहेत. हे रणगाडे क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत.
गलवान खोऱ्यामध्ये हिंसक झुंज होऊन देखील चीन ने अद्याप माघार घेतलेली नाही. अजून देखील चिनी सैन्य व युद्धसामग्री गलवान खोऱ्याच्या सीमेलगत आहेत. तसेच त्या संदर्भात त्यांची जमवाजमव देखील सुरू आहे. ही परिस्थिती पाहता आज चुशुल येथे भारत आणि चीनच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गलवान खोऱ्यात नदी काठाजवळ चीनने ज्या आक्रमक पद्धतीने सैन्याची जमवाजमव करुन शस्त्र सज्जता ठेवली आहे. ती लक्षात घेऊनच भारतीय सैन्याने इतक्या उंचावरील भागात टी-९० भीष्म रणगाडे तैनात करण्याचा निर्णय घेतला. या भागाबाबत विचार करायचा झाला तर येथे उंचावरील क्षेत्रात भारतीय सैन्य महत्त्वाचा ठिकाणी तैनात आहे. पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या १५९७ किलोमीटरच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याने युद्ध वाहनांसह १५५ एमएम हॉवित्झर तोफाही तैनात केल्या आहेत. चीनच्या कुठल्याही आव्हानाला प्रयुत्तर देण्यासाठी चुशुल सेक्टरमध्ये दोन टँक रेजिमेंट तैनात केल्या आहेत. चीनला एक इंचही भूमी द्यायची नाही. उलट यापुढे चीनची कुठलीही दादागिरी खपवून घ्यायची नाही अशी भारताची भूमिका आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी