महाराष्ट्राची लक्तरे वेशीवर!
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्रात जे नाटक सुरु झाले आहे ते नाटक संपण्याचे काही नाव घेत नाही. राजकारणाने इतक्या खालच्या थराची पातळी गाठली आहे की, संपूर्ण भारतातील जनता महाराष्ट्रावर हसत आहे. पण, राजकारण्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना याचे काहीच सोयरसुतक नाही. आपली संस्कृती, आपली एकता, आपल्या संतांची शिकवण याचा सर्वांना विसर पडलेला आहे. कोंबड्यांच्या झुंजी लावतात तशा दिल्लीने झुंजी लावून महाराष्ट्राची पार बदनामी चालवली आहे. हे सर्व समजत असूनही राजकारणी माघार घ्यायला तयार नाहीत हेच महाराष्ट्राचे दुर्दैव.
ती एक नटी कंगना तोंडात येईल ते बरळत आहे. महाराष्ट्राचा बाप काढत आहे. ती असे का बोलली याची पार्श्वभूमी तपासण्यापेक्षा तीने महाराष्ट्राचा बाप आणि मुंबई पोलिसांबद्दल बोलण्याची तिची लायकी ती काय? तीची ती असभ्यतेची भाषा महिला वर्गाला शोभते का? उखाड लो जो उखाडना है, हे काय बोलणे झाले का? मग, मुंबई महापालिकेने उखडले तिचे घर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, खासदार यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणे म्हणजे तो महाराष्ट्राचा अपमानच आहे. यापूर्वी ही सभ्यता सर्वांकडूनच पाळली जात होती. पण, हल्ली मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे चेष्टेची बाब झाली आहे. त्या रियाकडून चिमूटभर ड्रग्सचा तपास लावण्यासाठी सीबीआय ने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. बरं, ती रिया कुठली? तो सुशांत कुठला आणि ती कंगणा कुठली? मग, यांचा त्रास महाराष्ट्राला का? महाराष्ट्र सरकार पण नाही त्याच लोकांच्या तोंडाला लागून त्याला महत्व देते आणि विरोधी पक्ष तर एकदमच थर्डक्लास. सगळेच महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगत आहेत. त्या कंगनासाठी केंद्र सरकारने तरी वाय प्लस सुरक्षा देण्याची गरज काय? ती पाकिस्तान जिंकून भारतात येत आहे का? तिला मुंबईत येणे इतके गरजेचेच होते का? वातावरण शांत झाल्यानंतरही ती येऊ शकत होती? पण, केंद्रालाच वातावरण तापत ठेऊन महाराष्ट्र सरकार आणि राज्यच अस्थिर करणं तसेच बिहारच्या निवडणूकीत हा प्रमुख मुद्दा बनवून सहानुभूतीची लाट निर्माण करुन निवडणूक जिंकणे हा साधा सरळ डाव केंद्राने आखला आहे.
विरोधातील सर्व नेते मिडिया समोर येऊन कंगनाची बाजू घेत आहेत हे पाहून आश्चर्यच वाटते. तो दुसरा अर्णब गोस्वामी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करतो आहे? अशी पत्रकारिता आजपर्यंत कोणी पाहिली आहे का? एखाद्या चॅनेलचा संपादक अशाप्रकारे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना एकेरी भाषेत हिणवून आव्हान देऊ शकतो का? कुठे चालली आहे पत्रकारिता? उलट अशा चॅनेलवरच मराठी चॅनलने बंदी घातली पाहिजे. हे हिंदी चॅनलवाले महाराष्ट्रात येऊन अक्षरशः हैदोस घालत आहेत. सरळसरळ सुपारी घेऊन टार्गेट केले जात असल्याचे पहायला मिळत आहे. काल तर हेच हिंदी चॅनलवाले एका पोस्टमनला कंगनाचा दोष काय असे विचारत होते. हे अजून किती खालची पातळी गाठणार? महाराष्ट्र, मुख्यमंत्री, मुंबई पोलिस यांची काही इज्ज्त आहे की नाही? विरोध कुठे, कोणाचा आणि कधी करावा याचे भानही विरोधी पक्षाला नाही. फक्त विरोधासाठी म्हणून विरोध करायचा. एका सरकारला बदनाम करण्याच्या नादात आपण आपल्या राज्याची सरेआम बेअब्रु काढत आहोत हे ही विरोधी पक्षाला समजू नये? केंद्राला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची इज्जत गेली तरी चालेल असे विरोधकांनी ठरविले आहे का? इतर राज्यातील राजकारणी राज्यावर आफत आली तर एकत्र येतात. पण, महाराष्ट्र ही संतांची भूमी असूनही संयम आणि समज ही गोष्टच कोणाकडे नाही. आपण कुत्र्यासारखे भांडत आहोत आणि देशातील राज्ये आपल्यावर अक्षरशः हसत आहेत. आता तरी शहाणे व्हा या प्रकरणाला जास्त महत्त्व देऊ नका. महाराष्ट्रातून कोरानो कसा हद्दपार होईल ते पहा. राज्याच्या विकासाकडे आणि प्रगतीकडे लक्ष द्या. बस्स झाले आता कंगना आणि सुशांत. झाली तितकी पुरी झाले अजून महाराष्ट्राची अब्रू घालवू नका ही सरकार, विरोधी पक्ष आणि मिडियाला कळकळीची नम्र विनंती!