चीनला त्याच्याच भाषेत उत्तर देणार भारत, एल ए सी वर तयारी सुरू

नवी दिल्ली, दि. २५ मे २०२०: चीन आणि भारत यांच्यातील सीमा वाद आणखीन वाढत चालला आहे. डोकलाम नंतर पुन्हा एकदा भारत आणि चिनी सैन्य समोरासमोर आले आहेत. लडाख सीमेवरील अनेक ठिकाणांवर भारत आणि चिनी सैन्य पाऊल देखील हलवण्याचे नाव घेत नाहीत. सीमेवर चालू असलेली विकास कामे थांबवण्यास भारत तयार नाही आणि आपल्या विकासकामांवर भारताने ठोस भूमिका घेतली आहे. या विकास कामांसाठी भारत सरकार कडून कामगारांपासून ते लागणारे सर्व सामान पोहोचवण्याची लगबग चालूच आहे. यावेळेस भारताने चीनला चोख प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे.

देशांतर्गत चर्चेचा कोणताही परिणाम नाही:

भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावरून अनेक राजकीय चर्चा घडवण्यात आल्या परंतु या चर्चांचा कोणताही सकारात्मक परिणाम झालेला दिसला नाही. पॅगोंग शो लेक, गॅल्व्हन व्हॅली आणि डेमचॉक या भागांमध्ये भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आपल्या आपल्या स्थितीवर कायम आहेत. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) पायगोंग शो आणि गॅलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये तणाव गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी झडप झाल्याच्या बातम्या आल्या असून त्यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिकही जखमी झाले आहेत.

डोकलाम नंतर पहिल्यांदाच एवढा तणाव

सतत चालू असलेल्या या वादामुळे दोन्ही देशांच्या कमांडर मध्ये तणाव कमी करण्यासाठी सातत्याने चर्चा चालू होती. परंतू या चर्चेचा कोणताही सकारात्मक परिणाम झालेला दिसला नाही. चीनने असा आरोप केला होता की, भारतीय सैनिकांनी गस्त घालत असलेल्या चिनी सैनिकाला अटक केली आहे. या आरोपाचे भारतीय सैन्याने खंडन केले आहे. तसेच सीमेवरील इतर घडामोडींविषयी माहिती देणे देखील टाळले आहे.

एकमेकांची नावेही घेत नाहीत

रविवारी चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी आपल्या दीर्घ पत्रकार परिषदेत एकदा सुद्धा भारताचा उल्लेख केला नाही. त्याचबरोबर चीनचा उल्लेख देखील नवी दिल्लीकडून केला गेला नाही. चायना नॅशनल पीपल्स काँग्रेस शुक्रवारपासून सुरू होत असल्याने हे संपेपर्यंत भारत आणि चीन मध्ये कोणतेही तार्किक संवाद होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा