पहिल्या टी-२० रोमांचक लढतीत भारताचा ४ धावांनी पराभव, वेस्ट इंडिजची मालिकेत आघाडी

त्रिनिदाद, वेस्ट-इंडीज ४ ऑगस्ट २०२३ : जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने, गुरुवारी येथे पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचा चार धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजच्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ होल्डर (२/१९), ओबेड मॅककॉय (२/२८) आणि रोमारियो शेपर्ड (२/३३) यांच्या धडाकेबाज गोलंदाजीसमोर नऊ बाद १४५ धावांतच आटोपला. डावखुरा फिरकी गोलंदाज अकील हुसेनने गोलंदाजी करत १७ धावांत एक विकेट घेतली. भारताकडून पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या.

संघाने पाचव्या षटकात २८ धावांत दोन्ही सलामीवीर शुभमन गिल (०३) आणि इशान किशन (०६) यांच्या विकेट्स गमावल्या. गिलला हुसेनच्या चेंडूवर यष्टिरक्षक जॉन्सन चार्ल्सने यष्टिचित केले तर इशानला डावखुरा वेगवान गोलंदाज मॅककॉयने मिडऑनला पॉवेलकडे झेलबाद केले. सूर्यकुमारने हुसेनच्या चेंडूवर चौकार मारून खाते उघडले आणि पुढच्या षटकात अल्झारी जोसेफला चौकार आणि एक षटकार ठोकला. वर्माने अल्झारी जोसेफच्या चेंडूवर सलग दोन षटकार मारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धावांची सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या होत्या. वर्मानेही शेपर्डला लागोपाठच्या चेंडूंवर षटकार आणि चौकार लगावले पण हेटमायरने होल्डरच्या चेंडूवर सूर्यकुमार (२१) याचा शानदार झेल घेत त्याचा डाव संपवला. भारताने १० षटकांत ३ गडी गमावून ७० धावा केल्या. वर्माने पुढच्या षटकात शेपर्डला आणखी चौकार मारले पण त्याच षटकात बाऊंड्रीवर हेटमायरन त्याला झेलबाद केले.

वर्माने २२ चेंडूंचा सामना करताना तीन षटकार आणि दोन चौकार मारले. भारताचे शतक १५ व्या षटकात पूर्ण झाले. शेवटच्या पाच षटकात भारताला विजयासाठी ३७ धावांची गरज होती, पण पुढच्याच षटकात संघाने कर्णधार पंड्या (१९) आणि संजू सॅमसन (१२) यांच्या विकेट्स गमावल्या. होल्डरने पांड्याला बोल्ड केले तर सॅमसन धावबाद झाला. मात्र, ती ओव्हर मेडेन होती.

जोसेफच्या पुढच्या षटकात केवळ पाच धावा झाल्या. भारताला शेवटच्या तीन षटकात ३२ धावांची गरज होती. अक्षर पटेलने (१३) १८व्या षटकात होल्डरला षटकार खेचून ११ धावा दिल्या, पण पुढच्याच षटकात मॅककॉयने त्याला झेलबाद केले. अर्शदीपने मॅककॉयला सलग दोन चौकार मारून भारताच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, भारतीय संघाला शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. शेपर्डने कुलदीप यादवला (०३) बोल्ड केले तर अर्शदीप (११) धावबाद झाल्याने भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा