पुणे, ता. २७ नोव्हेंबर २०२२ : भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ने ट्विट करून याची माहिती दिली आहे. हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर हा सामना खेळवला जात होता. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिला फलंदाजी करताना भारताने ४.५ षटकांपर्यंत २२ धावा केल्या असताना पावसाला सुरवात झाली. अखेर ३ तास ४७ मिनिटांनंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा हा सामना प्रत्येकी २९ षटकांचा करण्यात आला व सामन्याला पुन्हा सुरवात करण्यात आली. त्यानंतर १२.५ षटकांचा खेळ झाला. तेव्हा पुन्हा पाऊस सुरू झाला. यानंतर सामना होऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात येत असल्याची घोषणा पंचांनी केली.
सामना रद्द होण्यापूर्वी भारताने एक विकेट गमावून ८९ धावा केल्या होत्या. शुभमन गिल (४२ चेंडूंत ४५) आणि सूर्यकुमार यादव (२५ चेंडूनत ३४) नाबाद राहिले. कर्णधार शिखर धवन १० चेंडूंत तीन धावा करून बाद झाला. अशाप्रकारे तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने१-०अशी आघाडी घेतली आहे. तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी (ता.३० नोव्हेंबर) खेळवला जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी :