‘भारताने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊ नये’, ॲप्स वर बंदी घालण्या वरून चीन भडकला

नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर २०२०: चिनी अॅपवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने बुधवारी आक्षेप नोंदविला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने मंगळवारी चिनी मूळच्या ४३ अॅप्सवर बंदी घातली होती. चीनने भारताच्या या निर्णयाला डब्ल्यूटीओ नियमांचे उल्लंघन म्हटले आहे.

मे महिन्यात लडाख येथे भारत आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीनंतर भारताने चीनी मूळच्या अ‍ॅपवर बंदी घालण्याची ही चौथी वेळ आहे. आतापर्यंत भारताने सुमारे २६७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

‘भारताने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊ नये’

भारतात असलेल्या चीनच्या दूतावासातील प्रवक्ते जी रोंग म्हणाले, चीन संबंधित मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्यासाठी भारत राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत आहे. आम्ही याला कडाडून विरोध करतो.

हे पाऊल जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या विरोधात असल्याचे सांगत जी यांनी भारताला चिनी अॅपवरील बंदी उठविण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की भारतीय बाजूने चीनसह सर्व देशांमध्ये कोणताही भेदभाव न करता बाजारात प्रवेश निश्चित केला जाईल आणि डब्ल्यूटीओ नियमांचे उल्लंघन करणारी पावले मागे घेतील.”

जी म्हणाले, “चिनी कंपन्यांनी सातत्याने पुनरुच्चार केला आहे की चिनी कंपन्या आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतात आणि कायदा आणि नैतिकतेच्या कक्षेत काम करतात.”

‘भारत आणि चीन हे एकमेकांना धोका नाही’

चिनी दूतावासाचे प्रवक्ता म्हणाले की, “भारत आणि चीन एकमेकांना धमकी देण्याऐवजी विकासाच्या संधींचे प्रतिनिधित्व करतात. दोन्ही बाजूंनी परस्पर हितसंबंधांसाठी योग्य दिशेने द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार संबंधांचा पाठपुरावा केला पाहिजे. दोन्ही देशांनी परस्पर संवादातून सकारात्मक वातावरण तयार केले पाहिजे.”

भारत आणि चीन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून तणाव आहे. दोन्ही देशांमध्ये लष्कराच्या व राजनयिक पातळीवरील चर्चेच्या अनेक फेऱ्या ही पार पडल्या आहेत, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा