नवी दिल्ली, ५ ऑक्टोंबर २०२०: भारतानं सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर संपर्क यंत्रणा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात मेगा कमुनिकेशन नेटवर्क बनवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे. या अंतर्गत सीमावर्ती भागात भारत फायबर ऑप्टिक केबल पसरवणारा आहे. याचं कारण असं आहे की, फायबर ऑप्टिक केबल या सर्वात सुरक्षित मानल्या जातात. आतापर्यंत भारतीय सैनिक आपापसातील संभाषण असो किंवा सीमेवरून कमांडिंग ऑफिस वर संपर्क साधण्याचा असल्यास रेडिओद्वारे साधले जात असे. हे संभाषण इंटरसेप्ट करणं अतिशय सोपं होतं. म्हणजेच आपल्या सैन्यातील माहिती फारशी सुरक्षित नव्हती. तर दुसऱ्या बाजूला चीननं संपूर्ण सीमावर्ती भागात फायबर ऑप्टिक जाळं पसरवलं आहे.
संरक्षण मंत्रालयानं असं सांगितलं आहे की, आतापर्यंत आपण सैनिकांमध्ये आपापसात संपर्क साधण्यासाठी एसिंक्रोनस ट्रांसफर मोड टेक्नॉलॉजी चा वापर करत होतो. यात सुधारणा करून आता आपण इंटरनेट प्रोटोकॉल आणि मल्टी प्रोटोकॉल लेबल स्विचींग (एम पी एल एस) टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत. यासाठी मोठ्या प्रमाणावर फायबर ऑप्टिक केबल जाळं सीमावर्ती भागात पसरवणं महत्त्वाचं आहे. यासह मायक्रोवेव्ह रेडिओ आणि सॅटेलाईट चा वापर आपण करणार आहोत. सॅटेलाईट च्या बाबतीत बोलायचं झालं तर इसरो’नं याआधी काही सेटलाईट यासाठी प्रक्षेपित केले आहेत तर पुढील काळात काही सॅटेलाइट प्रक्षेपित केल्या जातील.
संरक्षण मंत्रालय द्वारे सुरू करण्यात आलेले हे ऑपरेशन एस्कॉन (आर्मी स्टॅटिक स्विचेड कम्युनिकेशन नेटवर्क) नावानं ओळखला जाईल. हा पूर्ण प्रकल्प आयटीआय द्वारे पूर्ण केला जाईल. या प्रकल्पातील फेज वन, फेज टू आणि फेज थ्री स्तरावरील कामं सुरू करण्यात आली आहेत. आणि आता फेज फोर मधील काम देखील सुरू केलं जाणार आहे. या प्रकल्पात भारत ७,७५६.३९ कोटी रुपये खर्च करणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पात ज्या फायबर ऑप्टिक केबल वापरल्या जाणार आहे त्या पूर्णपणे भारतीय बनावटीचा असणार आहे. म्हणजेच त्या भारतात बनवल्या जाणार आहेत. यामुळं भारतात अनेक लोकांसाठी रोजगार, नोकरी व उत्पन्न उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प पुढील तीन ते चार वर्ष सुरू राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे