अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख नागरिकांना भारतात आश्रय देणार- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट २०२१: मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी 7 LKM येथे अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतावा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  सूत्रांनुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात येणाऱ्या प्रत्येक अल्पसंख्याकांना मदत केली जाईल.  पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनएसए अजित डोभाल उपस्थित होते.
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
 एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी असेही म्हटले की, भारताने केवळ आपल्या नागरिकांचे संरक्षण करू नये, तर आपण शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांनाही आश्रय दिला पाहिजे जे भारतात येऊ इच्छितात आणि आपण सर्व शक्य मदतही केली पाहिजे.  मदतीसाठी भारताकडे पाहणाऱ्या आमच्या अफगाण बांधवांना मदत केली पाहिजे.
 पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव डॉ पीके मिश्रा, एनएसए अजित डोभाल आणि कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.  असे मानले जाते की, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि राजदूत रुद्रेंद्र टंडन देखील बैठकीत उपस्थित होते.  राजदूत टंडन काबूलहून येणाऱ्या विमानाने काल जामनगरमध्ये दाखल झाले.
अफगाणिस्तानसाठी जारी केला विशेष क्रमांक
 दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने २४ तासांच्या विशेष अफगाणिस्तान सेलचे क्रमांक मंगळवारी जारी केले.  अफगाणिस्तानातून परत आणणे आणि इतर विनंत्यांचा समन्वय साधण्यासाठी विशेष सेलची स्थापना करण्यात आली आहे.
 फोन नंबर: +91-11-49016783,
 +91-11-49016784, +91-11-49016785
व्हॉट्सअॅप क्रमांक: +91-8010611290
ई-मेल: SituationRoom@mea.gov.in
 दुसरीकडे, सी -१७ ग्लोबमास्टर विमान काबूलमधून १२० भारतीयांना घेऊन काल भारतात दाखल झाले.  सी -१७ ग्लोबमास्टर विमान प्रथम गुजरातमधील जामनगर येथे थांबवण्यात आले.  त्यानंतर ते हिंडन एअरबेसवर आणण्यात आले.  परत आलेल्यांमध्ये भारतीय दूतावासाचे अनेक कर्मचारी, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि काही भारतीय पत्रकारांचा समावेश आहे.  भारतीय दूतावासातील सर्व लोक परत आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा