भारत VS न्यूझीलंड वनडे : उद्यापासून ऑनलाईन तिकीट विक्री

4

रायपूर, १० जानेवारी २०२३: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील डे – नाईट वनडे सामना २१ जानेवारी रोजी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रायपूरला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमान पद मिळाले आहे. त्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

  • विद्यार्थ्यांंना मिळणार ३०० रुपयांमध्ये तिकीट

या संदर्भात छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी रायपूर येथे पत्रकार परिषद घेत, तिकिटांचे दर, बैठक व्यवस्था, स्टेडियममधील खाद्यपदार्थांचा मेनू हे मुद्दे स्पष्ट केले. दरम्यान, या सामन्याची ११ जानेवारीपासून ऑनलाईन तिकिटे उपलब्ध होणार असून ११ ते १२ जानेवारी पर्यंत तिकीट बुकिंग करणाऱ्यांना कुरियरद्वारे घरापर्यंत तिकीटे पोहोचविले जाणार आहे. तर क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश तर विद्यार्थ्यांना ३०० रुपयांमध्ये सामन्याचा आनंद घेता येईल. तर ऑनलाइन तिकिट विक्रीनंतर १४ तारखेपासून आरडीसीए मैदानावर ऑफलाइन तिकिटे उपलब्ध होतील.

विद्यार्थ्यांना तिकीट दरात सवलत हवी असल्यास शाळेचे ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे तिकीट सोडल्यास ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत तिकिटाचे दर असतील. तर ५०० सिल्वर, ६००० गोल्ड आणि ७५०० पर्यंतची तिकिटे उपलब्ध असून कॉर्पोरेट बॉक्ससाठी १० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

  • बाहेरून खाद्य आणण्यास सक्त मनाई

सूत्रानुसार, १९ जानेवारीला भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ रायपूरला पोहोचतील. २० तारखेला दोन्ही संघ सराव करतील आणि २१ तारखेला सामन्यासाठी मैदानात उतरतील. सामन्यासाठी प्रेक्षकांना साधारण एक ते दोन तास आधी पोहोचावे लागणार आहे. बाहेरून खाद्य आणण्यास सक्त मनाई असून प्रेक्षकांसाठी स्टेडियममध्ये खाद्यपदार्थ ठेवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे आसन व्यवस्थेत फ्री सेटिंगची व्यवस्था असणार आहे. सामन्यादरम्यान कोरोनाशी संबंधित कोणतीही मार्गदर्शन तत्वे जारी करण्यात आलेली नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे.