Ind Vs Wi 2nd ODI, 10 फेब्रुवारी 2022: भारताने बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळलेला दुसरा एकदिवसीय सामना 44 धावांनी जिंकला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या पूर्णवेळ कर्णधारपदाची सुरुवात मालिका विजयानं झालीय. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडिया आता 2-0 ने पुढं आहे आणि मालिका जिंकलीय.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 193 धावांवर आटोपला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने चार विकेट घेतल्या. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा हा सलग सातवा एकदिवसीय मालिका विजय आहे.
गोलंदाजांनी टीम इंडियाची वाचवली लाज
केवळ 238 धावांवर बचावासाठी उतरलेल्या टीम इंडियाला गोलंदाजांनी वाचवलं. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने संपूर्ण सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरला हलवून ठेवलं. कृष्णाने पहिल्या दोन षटकांत दोन बळी घेतले होते. टीम इंडियाच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा निम्मा संघ अवघ्या 76 धावांत बाद झाला.
विशेष बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीत अनेकदा असे बदल केले, त्यानंतर लगेचच भारताला विकेट मिळाल्या. गेल्या सामन्यात अष्टपैलू दीपक हुड्डाला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, पण यावेळी तो गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्याच षटकात विकेट घेतली.
भारताकडून सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या, प्रसिद्ध कृष्णाने 9 षटकात 12 धावा देत चार विकेट घेतल्या. त्याचवेळी शार्दुल ठाकूरला दोन, युझवेंद्र-सिराज-सुंदर-हुडा यांना प्रत्येकी एक विकेट घेता आली.
टीम इंडियाची फलंदाजी
दुसऱ्या सामन्यात फलंदाजीच्या बाबतीत टीम इंडिया सपशेल अपयशी ठरली. सर्वांना आश्चर्यचकित करून रोहित शर्माने (5 धावा) ऋषभ पंतला (18 धावा) सलामीला आणलं. पण दोघेही लवकर बाद झाले, विराट कोहलीही केवळ 18 धावा करू शकला. मात्र, यानंतर उपकर्णधार केएल राहुल (49 धावा) आणि सूर्यकुमार यादव (64 धावा) यांच्यात चांगली भागीदारी झाली.
केएल राहुल त्याच्या चुकीमुळं धावबाद झाला, त्यानंतर सूर्यकुमार यादवनेही खराब शॉट खेळून विकेट गमावली. शेवटी, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी छोटे डाव खेळून टीम इंडियाची धावसंख्या 237 पर्यंत नेली. (भारताची धावसंख्या: 237/9, 50 षटके)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सात एकदिवसीय मालिका (भारतात)
2006-07 – भारत 3-1 ने जिंकला (4 सामने)
2011-12 – भारत 4-1 ने जिंकला (5 सामने)
2013-14 – भारत 2-1 ने जिंकला (3 सामने)
2014-15 – भारत 2-1 ने जिंकला (5 सामने)
2018-19 – भारत 3-1 ने जिंकला (5 सामने)
2019-20 – भारत 2-1 ने जिंकला (3 सामने)
2021-22 – भारत 2-0 ने आघाडीवर (3 सामने)
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे