तवांग चकमकीनंतर भारतीय लष्कर अलर्टवर, लढाऊ विमानंही सज्ज

5

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२२: अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतीय लष्कर पूर्ण अलर्टवर आहे. भारतीय हवाई दल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह (LAC) अरुणाचल प्रदेशातील अनेक भागात बारीक लक्ष ठेवून आहे. या परिसरात होणाऱ्या सर्व हालचालींवर भारतीय हवाई दलाची पूर्ण नजर आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी हवाई दलाची लढाऊ विमानं तयार करण्यात येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दल आणि लष्कर मिळून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भारतीय हवाई दलानं या भागात पाळत ठेवण्यासाठी विमानांची उड्डाणं वाढवलीत. त्याचा उद्देश स्पष्ट आहे की भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारे मागं हटू इच्छित नाही आणि चीननं कोणतंही कारस्थान केलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी आहे.

भारतीय लष्करानं सोमवारी दिली ही माहिती

तवांगमधील चकमकीची माहिती सोमवारी भारतीय लष्करानं दिली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत या चकमकीची माहिती दिली. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत एकही भारतीय जवान शहीद झाला नाही किंवा कोणताही जवान गंभीर जखमी झाला नसल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, चिनी सैनिकांनी घुसखोरी केली, त्यांचा भारतीय जवानांनी त्यांच्या पोस्टपर्यंत पाठलाग केला.

२०२० सालानंतर चीन आणि भारत यांच्यातील हा पहिला मोठा संघर्ष आहे. २०२० मध्ये पूर्व लडाखच्या गलवान भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती, ज्यामध्ये अनेक भारतीय जवानही शहीद झाले होते.

तवांगमधील चकमकीसंदर्भात चीनचं वक्तव्य

तवांगमध्ये भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीवर चिनी सैन्यानेही प्रतिक्रिया दिलीय. भारतीय सैनिकांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली आणि नेहमीच्या गस्त घालत असलेल्या चिनी सैनिकांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप चिनी सैन्याने केलाय. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली.

त्याचवेळी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांवर भारतानं कडक नियंत्रण ठेवावं आणि चीनला लागून असलेल्या सर्व सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करावी, असं चिनी लष्कराच्या वतीनं सांगण्यात आलं.

दुसरीकडं, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानंही या चकमकीसंदर्भात एक निवेदन जारी केलंय. सीमेवरील परिस्थिती ‘स्थिर’ असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. मात्र, सैनिक जखमी झाल्याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा