भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत, चारही जोड्या नेमबाजीत बाहेर; हॉकीमध्ये जोरदार पुनरागमन

टोकियो, २८ जुलै २०२१: मंगळवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू कोणतंही पदक जिंकू शकले नाहीत. शूटिंगमध्ये भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर पिस्टल आणि १० मीटर एअर रायफलच्या मिश्र स्पर्धेत निराश केलं. टेबल टेनिसमध्ये नंबर -१ खेळाडूसमोर कडक आव्हान सादर करूनही अचंत शरथ कमल हरला. तथापि बॉक्सिंग आणि हॉकीमध्ये नक्कीच चांगली बातमी आलीय. महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेन ने ६९ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचबरोबर पुरुषांच्या हॉकी संघानं स्पेनला ३-० ने पराभूत केलं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील सामन्यात झालेल्या पराभवाची निराशा मागं टाकली.

 

लवलिना बोरगोहेन’ने मिळविला ३-२ असा विजय

प्रथमच ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी लवलिना बोरगोहेन जर्मनीच्या नॅडिन अप्पेझचा पराभव करत भक्कम खेळ दाखविला. २३ वर्षीय लवलिना बोरगोहेनने तिन्ही फेऱ्यांमध्ये ३५ वर्षीय जर्मन प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखलं. बाउट स्प्लिट डिसिजनवर त्यांनी ३-२ असा विजय मिळविला. लवलिना बोरगोहेन आता पदक मिळविण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. बॉक्सिंगमध्ये एकदा उपांत्य फेरी गाठल्यानंतर किमान कांस्यपदक निश्चित असते. लवलिना बोरगोहेनची उपांत्यपूर्व फेरी ३० जुलै रोजी चिनी ताइपेच्या चिन निएन चेनशी होईल.


बॉक्सिंगमध्ये केवळ एक भारतीय महिला बॉक्सर एमसी मेरी कॉमने ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. मेरी कॉमने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. मेरी कोमनेही टोकियो ऑलिम्पिकमधील प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय.


भारतीय नेमबजांचा चुकला पुन्हा निशाणा


• शूटिंग इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. मंगळवारी चार भारतीय जोड्यांनी दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला पण त्यापैकी एकही पदक जिंकू शकला नाही.


• १० मीटर एअर पिस्टल मिसड स्पर्धेत मनु भाकर आणि सौरभ चौधरी या जोडीने पात्रता फेरी -२ मध्ये सातवे स्थान मिळवले.

• यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माची जोडी पात्रता फेरी १ बाहेर पडली.

• दहा मीटर एअर रायफलमध्ये दिव्यांशसिंग पंवार आणि इलेव्हनिल वॅलारीवानची जोडी पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर राहिली. अंजुम मुद्गिल आणि दीपक कुमारची जोडी १८ व्या स्थानावर राहिली.


दुसरीकडं भारतीय पुरुष हॉकी संघानं जोरदार पुनरागमन केले. पूल ए सामन्यात संघानं स्पेनला ३-० ने पराभूत केलं. रूपिंदर पाल सिंगने दोन तर सिमरनजितसिंगने एक गोल केला आहे. मागील सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १-७ असा पराभव पत्करावा लागला होता. या विजयासह भारत पुल मध्ये दुसर्‍या स्थानावर आला आहे. भारताकडं अजून दोन पूल सामने खेळायला बाकी आहेत.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा