भारतीय क्रिकेटपटू उमेश यादवच्या वडिलांचे निधन

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२३ : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या सुरवातीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विजय संपादन करीत भारताने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे, तर मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर ता. एक मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव कौटुंबिक कारणामुळे संघाबाहेर जाऊ शकतो.

उमेश यादवचे वडील तिलक यादव (वय ७४) यांचे बुधवारी (ता. २२ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले गेले होते; परंतु औषधोपचारांना प्रतिसाद देत नसल्याने अखेर डॉक्टरांनी उमेश यादवशी चर्चा केली होती. त्यानंतर उमेश यादवने वडिलांना नागपूरमधील घरी आणलं होतं. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, उमेश यादववर आलेल्या या अचानक संकटामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन कसोटी सामने; तसेच पुढील काही सामन्यांचा देखील तो भाग होऊ शकणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा