नवी दिल्ली, ८ जुलै २०२३ : जून महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका होणार होती. पण, आता ही मालिका ६ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलीय. क्रीडा परिषदेच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या मालिकेबाबत माहिती देताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, विश्वचषक २०२३ पूर्वी ही मालिका होणार नाही. आता भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका पुढील वर्षी जानेवारी २०२४ मध्ये खेळवली जाईल.
दरम्यान, जय शाह यांनीही आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या सहभागाला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, चीनमध्ये २३ सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहे. ते म्हणाले की, क्रीडा परिषदेने भारतीय पुरुष आणि महिला संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे.
भारताचा पुरुष आणि महिला संघ प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी २०१० आणि २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण, दोन्ही वेळा भारताने सहभाग घेतला नाही. आतापर्यंत दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला असताना, पुरुषांमध्ये एकदा श्रीलंका आणि एकदा बांगलादेशने सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये पाकिस्तानने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे. आता BCCI आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरूषांचा बी संघ आणि पूर्ण ताकदीचा महिला संघ पाठवू शकते.
माहितीनुसार, बीसीसीआय आपल्या खेळाडूंची यादी १५ जुलैपर्यंत ऑलिम्पिक परिषदेला पाठवेल. शिखर धवन आशियाई स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो. ऋतुराज गायकवाड, जितेश, रिंकू सिंग, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, राहुल चहर आणि तिलक वर्मा यांनाही संधी दिली जाऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड