नवी दिल्ली, 15 जानेवारी 2022: भारतीय पासपोर्ट आता पूर्वीपेक्षा अधिक स्त्राँग झालाय. होय, भारतीय पासपोर्टची ताकद जगात पूर्वीपेक्षा जास्त वाढलीय. भारतीय पासपोर्ट आता जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत 83 व्या स्थानावर पोहोचला आहे. हेन्ले पासपोर्ट इंडेक्स जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करते. त्यात एकूण 199 देशांच्या पासपोर्टचा समावेश आहे. सन 2021 मध्ये भारतीय पासपोर्ट 199 देशांच्या क्रमवारीत 90 व्या क्रमांकावर होता, परंतु 2022 मध्ये भारतीय पासपोर्ट 7 स्थानांनी झेप घेत 83 व्या स्थानावर पोहोचलाय.
आता भारतीय पासपोर्टने 60 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करता येणार
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत हे स्पष्ट झालंय की, गेल्या वर्षभरात भारतीय पासपोर्टची ताकद वाढली आहे. भारतीय पासपोर्टच्या या अधिकाराचा लाभ भारतीय पासपोर्ट असलेल्या सर्व भारतीयांना मिळणार आहे. आता भारतीय पासपोर्टधारक व्हिसाशिवाय जगातील 59 देशांमध्ये जाऊ शकतात. गेल्या वर्षीपर्यंत एकूण 58 देशांना भारतीय पासपोर्टद्वारे व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी होती.
या वर्षीची रँकिंग जाहीर झाल्यानंतर असे सांगण्यात येत होतं की, भारतीय पासपोर्टधारक आर्मेनियासह एकूण 60 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतील. पण नंतर आर्मेनियाने स्पष्ट केले की भारतीय पासपोर्टधारकांना देशात प्रवेश करण्यासाठी व्हिसा दाखवावा लागेल. त्यामुळं भारतीय पासपोर्टने व्हिसामुक्त प्रवास करणाऱ्या देशांची संख्या एका देशानं कमी केलीय.
IATA डेटाच्या मदतीने क्रमवारी जाहीर
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने जारी केलेल्या डेटाचा विचार करून हेन्ली पासपोर्ट इंडेक्स जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करते. कोणत्याही देशाच्या पासपोर्टची ताकद त्या देशाच्या पासपोर्टने व्हिसाशिवाय किती देश प्रवास करता येईल यावर अवलंबून असते. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत दोन देशांचे पासपोर्ट पहिल्या स्थानावर आहेत. होय, सिंगापूर आणि जपानचे पासपोर्ट या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहेत. या दोन्ही देशांच्या पासपोर्टवर जगातील एकूण 192 देशांना व्हिसाशिवाय प्रवास करता येतो.
रँकिंगमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कुठं
भारतीय पासपोर्टने 60 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येतो, तर आपल्या शेजारी देश पाकिस्तानच्या पासपोर्टने 32 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करता येतो. या क्रमवारीत अफगाणिस्तान आता तळाशी आलाय. अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीमुळं त्याचा पासपोर्टही पूर्णपणे कमकुवत झालाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे