दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ संकटात!

पुणे, ता. २५ डिसेंबर २०२२ : बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून (ता. २२ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या कसोटीत भारतीय संघ संकटात सापडला आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे बरोबर असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. कारण भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना सध्या ४५ धावांवर ४ गडी बाद अशा नाजूक अवस्थेत आहे. यजमानांचा पहिला डाव २२७ धावसंख्येवर उरकला. तर दुसऱ्या डावात भारताने यजमानांना २३१ धावांत गुंडाळले. बांगलादेशकडून लिटन दास (७३) आणि झाकीर हसनने (५१) झुंजार फलंदाजी करीत भारतासमोर विजयासाठी १४५ धावांचे आव्हान ठेवले. दोलायमान होत असलेल्या या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करीत संघाला मजबूत स्थितीत नेले. मात्र, तरी या धावा करणे फारसे सोपे नाही. कारण खेळपट्टी फारशी फलंदाजीला अनुकूल राहिली नाही.

दरम्यान, बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलामीवीर कर्णधार लोकेश राहुल (२), चेतेश्वर पुजारा (६), शुभमन गिल (७) आणि विराट कोहली (१) हे झटपट बाद झाल्याने भारतीय संघ अत्यंत नाजूक स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ४ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा