मोरोक्कोचे आक्रमण भेदत फ्रान्सचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे, १५ डिसेंबर २०२२ : शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोवर २-० अशा गोल अशा फरकाने विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला फ्रान्ससाठी थियो हर्नांडेझने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. तर ७९ व्या मिनिटाला रँडल कोलो मुआनीने गोल करीत संघाची आघाडी भक्कम केली. मोरोक्कोला सामन्यात एकही गोल करता आला नाही. यामुळे त्यांचा फ्रान्सने २-० ने पराभव केला.

सामन्याच्या सुरवातीपासून फ्रान्सच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी अवलंबली. त्यामुळे मोरोक्को संघावर दबाव आला. या संधीचा फायदा घेत फ्रान्सचा बचावपटू थियो हर्नांडेझने सामन्याच्या पाचव्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. फ्रान्सने केलेल्या गोलची परतफेड करण्यासाठी मोरोक्को संघाने आपले आक्रमण तीव्र केले. त्यांनी अनेक चढाया रचल्या; परंतु फ्रान्सच्या बचावपटूंनी आणि गोलकीपर ह्यूगो लॉरिस यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीमुळे मोरोक्कोच्या खेळाडूंना गोलची परतफेड करता आली नाही.

सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये गोलची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मोरोक्कोच्या खेळाडूंनी आपले आक्रमण तीव्र केले; परंतु त्यांना गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या ७९ व्या मिनिटाला फ्रान्सने उत्तम चढाई रचत दुसरा गोल केला. फ्रान्सच्या रँडल कोलो मुआनीने गोल करीत संघाची आघाडी भक्कम केली. या गोलनंतर फ्रान्सच्या खेळाडूंनी बचावात्मक भूमिका घेत खेळ केला. सामन्यात मोरोक्कोचा स्टार खेळाडू हकिमी अनेक संधी निर्माण करूनही गोल कऱण्यात अयशस्वी ठरला.

फ्रान्सला कडवी झुंज देणाऱ्या मोरोक्कोच्या खेळाडूंना गोलची परतफेड करता न आल्यामुळे फ्रान्सने त्यांचा २-० अशा गोल फरकाने पराभव केला. या विजयासह फ्रान्सने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, रविवारी (ता. १८) रात्री साडेआठ वाजता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा