नवी दिल्ली, ७ जानेवारी २०२३: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची मोठी चर्चा असताना सानिया मिर्झाने नववर्षाच्या सुरवातीलाच एक मोठी घोषणा केली आहे. सानियाने प्रोफेशनल टेनिस करिअरला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे सानियाने हा निर्णय घेतला असून, पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पिअनशिप ही तिची अखेरची मॅच असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय सानिया फेब्रुवारीमध्ये दुबईत होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यांना खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, सानिया मिर्झा दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल राहिली आहे. सानियाने गेल्या वर्षीच घोषणा केली होती की ती २०२२ च्या अखेरीस निवृत्त होणार आहे. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. अशा परिस्थितीत सानिया मिर्झा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून टेनिसला अलविदा करेल.
- पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित
सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१५) आणि पद्मभूषण पुरस्कार (२०१६) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत ६ मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.