पुणे, 29 जून 2022: देशात 1 जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारने आता सिंगल यूज प्लॅस्टिकच्या 19 वस्तूंवर बंदी घातली आहे. 1 जुलैपासून या वस्तूंचं उत्पादन, विक्री, साठवणूक आणि निर्यातीवर पूर्ण बंदी असेल. सिंगल यूज प्लास्टिक कचऱ्यामुळं होणारे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ही बंदी घालण्यात येत आहे.
सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो किंवा फेकून देऊ शकतो आणि ज्यामुळं पर्यावरणाला हानी पोहोचते.
पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत सिंगल-यूज प्लास्टिकपासून बनवलेल्या 19 वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी आता या वस्तू वापरत असेल तर त्याला या कायद्याच्या कलम 15 अंतर्गत दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कलम 15 मध्ये 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
कोणत्या वस्तूंवर बंदी
- प्लास्टिक स्टिक इअर बड्स
- फुग्यांसाठी प्लास्टिकची काठी
- प्लास्टिकचे ध्वज
- कँडी स्टिक
- आईस्क्रीम स्टिक
- थर्माकोल
- प्लास्टिक प्लेट
- कप
- ग्लास
- कटलरी
- काटे
- चमचा
- चाकू
- स्ट्रॉ
- ट्रे
- मिठाईचे डबे पॅकिंग करण्यासाठी वापरले जाणारे फिल्म रॅपिंग
- इन्विटेशन कार्ड
- सिगारेटची पाकिटं
- 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा PVC बॅनर
- स्टिरर
प्लास्टिक किती धोकादायक?
एकेरी वापराचे प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. अशा प्लास्टिकचे विघटन होत नाही किंवा ते जाळले जाऊ शकत नाही. त्यांचे तुकडे वातावरणात विषारी रसायने सोडतात, जे मानव आणि प्राण्यांसाठी धोकादायक असतात. शिवाय, एकेरी वापरण्यात येणारा प्लास्टिक कचरा पावसाचे पाणी जमिनीत जाण्यापासून रोखतो, ज्यामुळं भूजल पातळी कमी होते.
युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, जगभरात दर मिनिटाला दहा लाख प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेतल्या जातात. तर दरवर्षी 5 लाख कोटी प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. सर्व प्लास्टिक उत्पादनांपैकी निम्म्याहून अधिक उत्पादनं एकाच वापरासाठी तयार केली जातात. त्यामुळं प्लास्टिकचा कचरा पृथ्वीवर जमा होत आहे. युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की दरवर्षी 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो.
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सुमारे 200 दशलक्ष टन प्लास्टिकचा कचरा समुद्रात गेला आहे. 2016 पर्यंत, दरवर्षी 14 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा समुद्रात गेला आणि 2040 पर्यंत दरवर्षी 37 दशलक्ष टन कचरा समुद्रात जाईल असा अंदाज आहे.
भारताबद्दल बोलायचे झाले तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात असं म्हटलं आहे की, देशात दररोज 26 हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यापैकी फक्त 60% कचरा गोळा केला जातो. उर्वरित कचरा नदी-नाल्यांमध्ये मिसळतो किंवा तसाच पडून राहतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी 2.4 लाख टन सिंगल यूज प्लास्टिक तयार होते. त्यानुसार, प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 18 ग्रॅम सिंगल यूज प्लास्टिक कचरा तयार करते.
2017 मध्ये, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चा अहवाल आला. या अहवालात एक भारतीय दरवर्षी 11 किलो प्लास्टिक वापरतो, असे सांगण्यात आलं. 2017 मध्येच, नेचर कम्युनिकेशन्सच्या अहवालात असे म्हटलंय की मोठ्या प्रमाणात कचरा गंगा नदीत वाहून महासागरात पोहोचतो. महासागरांमध्ये सर्वाधिक प्लास्टिकचा कचरा पसरवण्यात गंगा नदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की ज्या वेगानं प्लास्टिकचा कचरा महासागरांमध्ये पसरत आहे, तोच वेग असाच सुरू राहिला तर 2050 पर्यंत महासागरांमध्ये माशांपेक्षा प्लास्टिकचे प्रमाण अधिक असेल.
सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय काय?
केंद्र सरकारने आता 19 वस्तूंवर बंदी घातलीय. भविष्यात त्यात आणखी सामग्री जोडली जाईल. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकच्या पर्यायाबाबतही सांगितलंय.
प्लास्टिक पिशव्यांऐवजी कॉटनच्या पिशव्या वापरता येतील. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या चमच्याऐवजी तुम्ही बांबू पासून बनवलेले चमचे वापरू शकता. त्याचबरोबर प्लास्टिकच्या कपांऐवजी मातीचे कप वापर करता येईल.
आता आणखी प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी येणार का?
देशात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचे उत्पादन, विक्री आणि साठवणूक करण्यावर आधीच बंदी आहे. 30 सप्टेंबरपासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.
आता एकेरी वापराच्या प्लास्टिकपासून बनवलेल्या 19 वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. यावर्षी 28 मार्च रोजी सरकारने लोकसभेत सांगितलं होतं की 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी घालण्यात येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे