भारताच्या चंद्रयान-३ चा चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश, इस्रोचे यश, २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर स्वारी

बंगळुरु, ६ ऑगस्ट २०२३ : भारताच्या चंद्रयान-३ ने अखेर चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. बंगळुरु येथून इस्रोने शनिवारी रात्री दिलेल्या कमांड प्रमाणे चंद्रयान- ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही प्रक्रिया सुरु झाली आणि यशस्वी झाल्याचे इस्रोने म्हटले आहे. त्यामुळे आता चंद्रयान-३ चा चंद्राच्या भूमीवर लँड होण्याचा प्रवास सुरु झाला आहे. आता २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान सॉफ्ट लँडींगचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर अमेरिका, रशिया, चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.

भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-३ आपल्या सर्वांत विश्वासार्ह पीएसएलव्ही रॉकेटद्वारे १४ जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेपावले आहे. या चंद्रयान मोहीमेतील अनेक महत्वाचे टप्पे यशस्वीपणे पार पाडले आहे. सुरुवातीला पृ्थ्वीच्या कक्षेत पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आता यान चंद्राच्या दिशेने निघाले आहे. काल (५ ऑगस्ट) चंद्राच्या कक्षेत यानाला इंजेक्ट करण्याची महत्वाची प्रक्रीया पार पाडण्यात यश आल्याचे इस्रोने म्हटले आहे.

इस्रोने शनिवारी सांगितले की, चंद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे दाखल झाले आहे. चंद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवर पोहोचण्याआधी ते चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. यावेळी त्याचा वेग कमी करण्यात येणार आहे. त्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे होईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करेल. भारताचे चंद्रयान-२ मोहिमेत चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आले नव्हते. यंदा कोणतीही कसूर राहू नये याची पूरेपूर दक्षता इस्रोने घेतली आहे. विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरद्वारे चंद्रावर संशोधन करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा