ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाकडून भारताचा पराभव

शफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

पुणे, ता. १५ डिसेंबर २०२२ : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या ‘ट्वेंटी २०’ सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा २१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २० षटकांत विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले होते; मात्र भारताला प्रत्युत्तरात २० षटकांत ७ बाद १५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. दीप्ती शर्माने १६ चेंडू २४ धावा चोपून शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला; मात्र शेवटच्या षटकात २७ धावांची गरज असताना भारताला फक्त ६ धावाच करता आल्या. भारताकडून सलामीवीर शफाली वर्माने सर्वाधिक ५२ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत ३ षटकार आणि ६ चौकार मारले. इंग्लंडकडून ब्राऊन आणि गार्डनरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्या षटकात पहिला धक्का बसला सलामीवीर स्मृती मानधना १० चेंडूंत अवघी १ धाव करून बाद झाली. दरम्यान, दुसरी सलामीवीर शफाली वर्माने पॉवर प्लेचा फायदा उचलत झापाट्याने धावा करण्यास सुरवात केली होती; मात्र दुसऱ्या बाजूने जेमिमाह रॉड्रिग्ज ११ चेंडूंत १६ धावांची भर घालून परतली.

यानंतर शफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. शफाली वर्माने ४१ चेंडूत ५२ धावा चोपल्या. या दोघींनी भारताला १४ व्या षटकात शंभरी पार करून दिली होती; मात्र शफाली वर्मा ५२ धावांवर बाद झाली. यानंतर देविका वैद्य आणि रिचा घोष या देखील प्रत्येकी १ धावेची भर घालून परतल्या. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीतने आपला गिअर बदलला होता.

तिने सामना ३० चेंडूंत ६० धावा असे समीकरण आणले; मात्र स्कॉटने तिला ३७ धावांवर बाद करीत भारताला सहावा आणि मोठा धक्का दिला. या धक्क्यातून भारत शेवटपर्यंत सावरलाच नाही. दीप्ती शर्माने २४ धावांची झुंजार खेळी करीत शेवटपर्यंत लढत दिली; मात्र भारताला १५१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा