तिरुवनंतपुरम (केरळ), २ ऑगस्ट २०२२: राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सोमवारी पुष्टी केली की ३० जुलै रोजी मरण पावलेल्या monkeypoxची लक्षणे असलेल्या २२ वर्षीय व्यक्तीचे चाचणी अहवाल विषाणूजन्य झुनोटिक संसर्गासाठी सकारात्मक असल्याचे आढळले. त्रिशूर जिल्ह्यातील चावक्कड कुरंजीयुर येथील या तरुणाची यूएईमध्ये सकारात्मक चाचणी झाली आणि ३० जुलै रोजी केरळमध्ये त्याचा मृत्यू झाला.
२६ जुलै च्या संध्याकाळी या युवकाला ताप आला. यानंतर या युवकाला २७ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ जुलै रोजी त्याला व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं. “३० जुलै रोजी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला माहिती दिली की १९ जुलै रोजी यूएईमध्ये मंकीपॉक्सची चाचणी घेण्यात आली आणि त्याचा निकाल सकारात्मक आला होता. आमची टीम तिथे गेली, दुर्दैवाने त्या व्यक्तीचा संध्याकाळी मृत्यू झाला. आमच्या प्रक्रियेनुसार, आम्ही नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) अलाप्पुझा येथे पाठवले होते आणि चाचणीच्या निकालांवरून तो मंकीपॉक्ससाठी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येते,” असं जॉर्ज यांनी सांगितलं.
त्याच्यावर एन्सेफलायटीस आणि इतर रोगांवर उपचार करण्यात आले आणि त्याला प्रतिजैविक (antibiotics) देण्यात आले. सध्या संपर्कात आलेल्या २० लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यामध्ये ३ आरोग्य कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. यामध्ये एका डॉक्टरचा आणि २ रुग्णसेविकांचा समावेश आहे.
आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, युएईमध्ये व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती ही माहिती कुटुंबाने लपवून ठेवली आहे की नाही याची खात्री नाही. “आम्ही राज्य वैद्यकीय मंडळाच्या सदस्यांसह राज्यस्तरीय टीम तयार केली आहे ज्यात खरोखर काय घडले आहे याची चौकशी केली आहे. आणि एनआयव्हीमध्ये नमुन्याचे genomic sequencing केले जात आहे,” अशी त्यांनी माहिती दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे