नवी दिल्ली, १५ नोव्हेंबर २०२०: देशाच्या परकीय चलन साठ्यानं (FCA) नवा विक्रम केलाय. मोदी सरकारच्या कार्यकाळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही परकीय चलन साठ्यात कमालीचा वेग पहायला मिळाला आहे. ६ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यानं ५६८.४९ अब्ज डॉलरचा नवा विक्रम केला. भारतीय रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार या काळात परकीय चलन साठ्यात ६.४०३ अब्ज डॉलरची वाढ होऊन हा साठा ५२४.७४२ अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे.
परदेशी चलन वाढ हेच परकीय चलन साठ्यातील वेगवान हालचालींचं कारण असल्याचं सांगितलं जातंय. परकीय चलन हा परकीय चलन भांडाराचा मुख्य भाग असतो. एफसीए डॉलरमध्ये मोजला जातो. मात्र, यात युरो, पाऊंड आणि येनसारख्या इतर परदेशी चलनांचा देखील समावेश असतो.
६ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार देशाच्या साने साठ्यातही मोठी वाढ झाली आहे. या काळात सोन्याच्या साठ्यात १.३२८ अब्ज डॉलरनं वाढून ३७.५८७ अब्ज डॉलर झाला. दरम्यानच्या काळात देशाचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीजवळील चलनसाठा ४ कोटी डॉलरने वाढून ४.६७६ अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे