नवी दिल्ली, २९ जानेवारी २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस चर्चासत्रामध्ये व्हिडिओ कॉन्फरिंग द्वारे संवाद साधला. ‘‘चौथी औद्योगिक क्रांती – मानवतेच्या हितार्थ तंत्रज्ञानाचा वापर’’ या विषयावर पंतप्रधानांनी भाषण केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विविध संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “१.३ अब्ज भारतीयांकडे असलेला आत्मविश्वास, सकारात्मकता आणि आशा यांचा संदेश आपण घेऊन आलो आहोत. महामारीच्या काळात भारताने ज्या पद्धतीने आपल्या क्षमता सिद्ध केल्या आणि या संकटाशी सामना केला, त्याचा अतिशय फायदा झाला. प्रारंभीच्या काळात संकटाची जाणीव झाल्यानंतर भारताने सक्रियता आणि सहभागीदारीच्या माध्यमातून सक्षम होण्याचा दृष्टिकोन स्वीकारला. त्याचा लाभ म्हणजे भारतामध्ये कोविडसाठी आवश्यक असणाऱ्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याचे काम वेगाने करण्यात आले.”
“आम्ही आमच्या मनुष्यबळाला संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण दिले. त्याचाही फायदा झाला. कोरोना रुग्णांचा शोध घेणे, चाचण्या करणे यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला. भारतामध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात भारताला यश आले.”
” जगाच्या लोकसंख्येचा विचार केला तर त्यापैकी १८ टक्के लोक भारतामध्ये राहतात. इतक्या प्रचंड लोकसंख्येला सुरक्षित ठेवण्यात आम्हाला यश मिळाले. भारताने कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केल्यामुळे मानवतेची मोठी शोकांतिका टाळणे शक्य झाले,” असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेविषयीही माहिती दिली तसेच या महामारीच्या काळामध्ये भारताने जागतिक स्तरावर किती मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले, याचीही माहिती त्यांनी दिली.
अनेक देशांमध्ये प्रवासी हवाई वाहतुकीवर निर्बंध असतानाही भारताने तिथल्या नागरिकांना मुक्त करण्यासाठी मदत केली. जगातल्या दीडशेपेक्षा जास्त देशांना कोरोना काळात आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठाही भारताने केला. आज भारत अनेक देशांना ऑनलाइन प्रशिक्षण देत आहे, त्यामध्ये आमच्या देशामध्ये असलेले पारंपरिक औषधोपचाराचे ज्ञान, लसीकरण आणि लसीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती कशी करावी, याची माहिती दिली जात आहे. भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या दोन लसींव्यतिरिक्त आणखी काही लसींच्या निर्मितीचे कामही भारतामध्ये सुरू आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की या लसींमुळे भारत जगाला मोठ्या प्रमाणावर आणि जास्त वेगाने मदत करू शकणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे