भारतातील सर्वात श्रीमंत महिला- सावित्री जिंदाल

पुणे, ३१ जुलै २०२२ : फोब्सर्च्या यादीनुसार भारत देशाच्या सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओ.पी. जिंदाल या उद्योगपतींच्या पत्नी सावित्री जिंदाल यांचे नाव समाविष्ट झाले आहे. फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्यांचा या यादीत पाचवा क्रमांक लागतो. प्रसिद्ध उद्योगपती ओ.पी. जिंदाल यांचे २००५ मध्ये हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाल्यावर जिंदाल समूहाची सर्व सूत्रे सावित्री जिंदाल यांनी हातात घेतली. ६० वर्षीय सावित्री जिंदाल या जिंदाल समूहाच्या आता अध्यक्षा आहेत.

सावित्री जिंदाल यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून मारवाडी घरातील एक महिला म्हणून त्यांनी आपला संसार सुरू केला. त्यांना एकूण दहा मुले झाली. पृथ्वीराज, सज्जन, रतन, नवीन यांच्यासह अन्य सहा मुले त्यांना झाली. सध्या त्यांची चार मुले विविध कंपन्यांचा कारभार पाहत असतात. पतीच्या निधनापर्यंत त्या संसारात सक्रिय होत्या. पती ओ. पी. जिंदाल यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे सुमारे १४ अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या जिंदाल समूहाची सर्व कामकाज त्यांनी चालवायला घेतले. यामुळे त्यांचे जीवनमानच बदलून गेले. एक घरगुती महिला ही भूमिका बदलून त्यांना एका उद्योगपतीच्या भूमिकेत जावे लागले. अर्थात ही नवीन भूमिका त्या अतिशय सकारात्मक रित्या निभावत आहे.

श्रीमंत असून सावित्री जिंदाल अतिशय साधेपणाने आपले जीवन जगतात. त्या साधी कॉटनची साडी नेसतात. जिंदाल समूह हा वीजनिर्मिती व पोलाद उत्पादनात कार्यरत आहे. सावित्री जिंदाल या हरियाणा विधानसभेच्या सदस्या असून काही काळ हरियाणाच्या वीजमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सावित्रीबाईंनी आपल्या समूहाची सूत्रे स्वीकारल्यापासून गेल्या पाच वर्षांत समूहाची उलाढाल तिपटीने वाढली आहे. त्या ज्या हिसार विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, त्या ठिकाणी पाच दशकांपूर्वी त्यांच्या पतीने छोटासा कारखाना सुरू करून आपल्या उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली होती. तोच वारसा त्या पुढे नेत आहेत. सावित्री जिंदाल या समूहाच्या अध्यक्षा असल्या तरी कंपन्यांचे कामकाज त्यांनी आपल्या चार मुलांना वाटून दिले आहे. ही मुले या कंपन्यांचे दैनंदिन कामकाज पाहतात. त्यातील नवीन जिंदाल हे कॉँग्रेसचे खासदार आहेत. सावित्रीबाईंनी आठवड्यातील तीन दिवस आपल्या मतदारसंघासाठी राखीव ठेवले आहेत. या तीन दिवसांत त्या नागरिकांना भेटतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात.

ओ. पी. जिंदाल यांनी हयात असतानाच आपल्या उद्योगांची वाटणी मुलांमध्ये करून दिली होती. मात्र, त्यांनी दिल्लीतील आपले घर सर्वांसाठी ठेवले आहे. आजही जिंदाल कुटुंब हे तेथे एकत्र राहते. या सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम सावित्रीबाई अतिशय उत्तमरीत्या करतात.

एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब शिकते, असं म्हणतात. ते काही उगाच नाही. आपल्याबरोबर कुटूंबाला पुढे नेण्याचं आणि यशस्वी करण्याचं काम त्या अतिशय नेटाने करत आहे. त्याचेच फळ त्यांना फोर्बच्या माध्यमातून मिळाले आहे, असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा