चीन आणि रशियाच्या फायटरला मात देत मलेशियाची पहिली पसंत ठरले भारताचे तेजस फायटर जेट

नवी दिल्ली, 4 जुलै 2022: तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, भारतात बनवलेले स्वदेशी हलके लढाऊ विमान, दक्षिण-आशियाई देश मलेशियाच्या लढाऊ जेट कार्यक्रमासाठी निवडले गेले आहे. भारत आणि मलेशियामध्ये या फायटर जेटच्या डीलबाबत बोलणी सुरू आहेत. हा करार लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मलेशियाच्या लढाऊ विमान कार्यक्रमाच्या स्पर्धेत चीनचे JF-17, दक्षिण कोरियाचे FA-50 आणि रशियाचे Mig-35 आणि Yak-130 यांचा समावेश होता. या सर्वांवर मात करत तेजसने पहिले स्थान पटकावले आहे.

एलसीए तेजसच्या डीलमध्ये, भारत मलेशियाला एमआरओ (मेंटेनेंस, रिपेयर आणि ओवरहॉल) ऑफर करत आहे. म्हणजेच मलेशियामध्येच एक फॅसिलिटी तयार केली जाईल जिथे भारतीय अभियंते तेजससह रशियन सुखोई Su -30 लढाऊ विमानाची दुरुस्ती देखील करतील. युक्रेन-रशिया युद्धामुळे रशियाला आंतरराष्ट्रीय करार करण्यास बंदी असल्याने मलेशिया सध्या रशियाची मदत घेऊ शकत नाही.

हे लढाऊ विमान बनवणारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन म्हणाले की, मला याबद्दल खूप आनंद झाला आहे आणि आम्ही हा करार नक्कीच करू असा पूर्ण विश्वास आहे. आमचे तेजस त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अनेक बाबतीत सरस आहे. चीनचे JF-17 हे लढाऊ विमान तेजसपेक्षा स्वस्त आहे पण तेजस Mk-1A प्रकारातील वैशिष्ट्यांसमोर ते कुठेही टिकत नाही. आमचे तेजस हे कोरिया आणि चीनच्या लढाऊ विमानांपेक्षा कितीतरी पटीने चांगले, वेगवान, प्राणघातक आणि अत्याधुनिक आहे.

माधवन म्हणाले की, पुढील वर्षापासून भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. स्वदेशी मल्टीरोल कॉम्बॅट फायटर जेट तेजस मार्क-2 बनवण्यास सुरुवात होणार आहे. यानंतर 2023 मध्ये याच्या हायस्पीड चाचण्या घेतल्या जातील. अशी माहिती दिली आहे. 2025 सालापर्यंत HAL तेजस मार्क-2 चे उत्पादन सुरू करेल. तेजसच्या या अपग्रेड केलेल्या आवृत्तीमध्ये अधिक इंधन, अधिक रेंज, अधिक वजन उचलण्याची क्षमता, अधिक इंजिन पॉवर आणि सुपीरियर नेट सेंट्रिक वॉरफेयर सिस्टम असेल. ते जास्त वजन आणि रेंजमुळे मार्क-1A पेक्षा चांगले असेल.

नेक्स्ट जनरेशन मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रकल्पाबाबत, माधवन म्हणाले की, खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनाही यात सहभागी करून घेण्याची योजना आहे. भारत फिफ्थ जनरेशन मिडीयम वेट डीप पेनेट्रेशन फायटर जेट बनवत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 36,428 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. फिफ्थ जनरेशन मिडीयम वेट डीप पेनेट्रेशन फायटर जेटचा प्रोटोटाइप 2026 पर्यंत तयार केला जाईल. त्याचे उत्पादन 2030 मध्ये सुरू होईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) सध्या या प्रकल्पात काम करत आहे. त्यांच्या बाजूने गोष्टी निश्चित झाल्यावर एचएएल त्यावर काम सुरू करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा