नवी दिल्ली, ९ जुलै २०२१: उत्तर दिल्लीतील बड़ा हिंदुराव भागात कायदा व सुव्यवस्था अवस्था उघडकीस आलीय. राजधानी दिल्लीच्या या गर्दीच्या ठिकाणी काही गुंडांनी मध्य रस्त्यावर अनेक गोळ्या झाडल्या. यादरम्यान दोन नागरिकांना यातील काही गोळ्या लागल्या. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ४ ते ५ गुंड हे नियोजपूर्वक एका व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी आले होते. त्या गुंडांनी आपले लक्ष असलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या पण गोळ्या रस्त्यावर चालत असलेल्या २ नागरिकांना लागल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू देखील झालाय. गोळीबारानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मारेकर्यांनी १५ ते २० गोळ्या अंदाधुंद झाडल्या होत्या.
कोरोना प्रोटोकॉलमुळं आजकाल बर्याच ठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात आहे. जेणेकरुन लोक सामाजिक अंतर आणि मास्क इत्यादींचा योग्य वापर करतील. परंतु प्रश्न असा उद्भवतो की, जेव्हा गर्दी असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा गोळीबार करण्यात आला तेव्हा पोलिस कोठे होते. या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांवर नक्कीच प्रश्न उपस्थित केले आहेत.
या दुचाकीस्वारांच्या गोळीबारातून दोन नागरिकांचा मृत्यू झाला. या गोळीबाराबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतंही निवेदन देण्यात आलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, हे गुंड आपल्या वाहनांवरून हातात बंदुका घेऊन फिरत होते. तसेच वाहनावरून जाताना ते हवेत गोळीबार देखील करत होते. ही संपूर्ण घटना गुरुवारी रात्री ९.४५ वाजता घडली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे