भारत चीन संबंध केवळ वादाचे नाही तर मैत्रीचे देखील: चिनी परराष्ट्रमंत्र्यांचे विधान

9

नवी दिल्ली, ८ मार्च २०२१: चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी रविवारी एक मोठे विधान करत असे म्हटले की, “भारत आणि चीन या दोन्ही देशांनी एकमेकांना कमी लेखणे थांबविले पाहिजे. तसेच एकमेकांना कमी दाखवणे देखील टाळले पाहिजे. दोन्ही देशांनी एकमेकांना संशयाच्या नजरेतून पाहणे थांबवावे व द्विपक्षीय सहाय्याने दोन्ही देशांमधील सीमावाद कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले की, भारत आणि चीन यांच्यातील संबंध केवळ सीमावाद एवढ्यापुरतेच मर्यादित आहेत या गोष्टीचे मी खंडन करतो. भारत आणि चीन यांच्यामध्ये याव्यतिरिक्त मैत्रीचे संबंध देखील आहेत. हे मैत्रीचे संबंध टिकून राहण्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

भारत-चीन संबंधांवर आपल्या वार्षिक प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तसेच कशाप्रकारे मागील एक वर्षापासून लडाखमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला Aजात आहे हे सांगत चिनी परराष्ट्रमंत्री वांग म्हणाले की, दोन्ही देशांकडून विवाद संपवणे आवश्यक आहे आणि द्विपक्षीय संबंधात वृद्धी करणेदेखील आवश्यक आहे. ते म्हणाले की, “सीमा विवाद हा इतिहास जमा झाला आहे. परंतु, भारत आणि चीन यांच्यातील संबंध दर्शवणारी ती एकमेव गोष्ट नाही.”

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचे हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा भारत आणि चीन यांच्यामध्ये पूर्व लडाख मध्ये सुरू असलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी कमांडर स्तरीय चर्चा सुरू होती. यानंतर दोन्ही देश आपले सैन्य मागे घेण्यासाठी तयार देखील झाले आहेत. एप्रिल २०२० पासून पूर्व लडाखमध्ये सीमेवरून चीन आणि भारत सैन्यामध्ये वाद सुरू होता. यानंतर आता दोन्ही सैन्य पूर्व स्थितीत जाण्यास देखील सुरुवात झाली आहे. असे होणे दोन्ही देशांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. तसेच याच प्रकारे इतर सीमा वाद देखील सोडवले जाऊ शकतात असे दोन्ही देशांचे मत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे