पुणे, दि. २६ जून २०२० : सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम स्थितीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य एका कीर्तनात केल्यामुळं निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज वादात सापडले होते. यानंतर आज इंदुरीकर महाराजांवर याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भुमाता ब्रिगेड सह इतर अनेक संघटनांनी इंदुरकर महाराजांनी केलेल्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आज इंदुरीकर महाराजांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा खटला दाखल करण्यात आला असून आजपासून यावर सुनावणी होणार आहे.
इंदुरीकर महाराज महिलांविषयी नेहमीच आपणास प्रत वक्तव्य करत असतात त्यांचा विरोध केल्यास त्यांना राजकीय पाठबळ देखील मिळत असते असे आपले मत व्यक्त करत तृप्ती देसाई यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, ‘इंदोरीकर हे त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यासाठी प्राचीन ग्रंथांचा आधार घेत होते. मात्र, पुत्रप्राप्तीचा सल्ला देणं हा पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळं कधी ना कधी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच होता, तो आज झाला. हा गुन्हा दाखल व्हावा. त्यांच्या कीर्तनातून वारंवार महिलांचा जो अपमान केला जातो, या प्रकरणी कारवाई व्हावी, अशी माझ्यासह इतर संघटनांची आग्रही मागणी होती. मात्र, राजकीय दबावापोटी व काही व्यक्तींमुळं इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी या प्रकरणाला वारकरी संप्रदायाशी जोडलं गेलं. हिंदुत्वाशी जोडलं गेलं. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या संघटनांची बदनामी केली गेली. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला.’
न्यूज अनकट प्रतिनिधी