इंदापूर, दि.७ मे २०२०: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांतर्गत सर्व औद्योगिक आस्थापनांना बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सध्या औद्योगिक उत्पादन ठप्प झाल्याने कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्य शासनाने काही नियम आणि अटींच्या शर्तीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू करण्यास परवानगी दिल्याने इंदापुरातील लोणी देवकर औद्योगिक वसाहतीमध्ये आजपासून कारखाने सुरू करण्यात आले आहेत.
तब्बल ४२ दिवसानंतर औद्योगिक वसाहतीमधील कलकलाट सुरू झाला आहे याच औद्योगिक वसाहतीमध्ये पूर्वी हजारोंच्या संख्येने कामगार काम करत होते. परंतु कोरोनामुळे अगदी तुरळक कामगार कामावर गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.
इंदापूर तालुक्यात लोणी देवकर या प्रमुख औद्योगिक वसाहतींसह इतरही लहान औद्योगिक वसाहती सुध्दा आहेत. या वसाहतींमध्ये अनेक लघू, मध्यम प्रकल्पांसह काही मोठे प्रकल्पही आहेत.
दरम्यान, अनेक लघु व मध्यम प्रकल्पांची संख्या अधिक असल्याने यात काम करणाऱ्या परराज्यातील कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः अनेक कारखान्यांमध्ये कंत्राटी स्वरुपाचे कामगार हजारोंच्या संख्येने आहेत. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कारखाने काही दिवसांपासून बंद होते परंतु राज्य सरकारने अर्थव्यवस्थेला चालना मिळावी या हेतूने काही नियम आणि अटी व शर्तींवर उद्योग धंदे सुरू करण्यास परवानगी दिल्याने येथील कारखाने सुरू झाले.
परंतु याच औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे बहुतांश कामगार हे परराज्यातील असल्याने कोरोनाच्या भीतीमुळे ते आपल्या मूळ गावी परत गेले आहेत. तसेच प्रशासनाने देखील उर्वरित कामगारांना आपल्या मूळगावी जाता यावे. यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना तसे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले असल्याने उरलेले कामगार देखील आपापली वैद्यकीय तपासणी करून घेऊन आपल्या मूळ गावी जाण्याची लगबग करीत आहेत.
परंतु आजपासून सर्व कारखाने सुरू झाल्याने या औद्योगिक वसाहतीमधील अनेक लहान-मोठे कारखाने मात्र कामगारांन अभावी कसे सुरू करावेत हा मोठा प्रश्न अनेक उद्योजकांपुढे सरसावला आहे. एकेकाळी याच औद्योगिक वसाहतीमध्ये दिवस-रात्र कामगारांची वर्दळ असायची परंतु कोरोनाच्या भीतीने आता कोणीही याठिकाणी काम करण्यास तयार नाही , त्यामुळे उद्योजकांनी आता कारखाने सुरू केलेत . परंतु कामगार आणायचे कुठून या समस्येत आहेत.
आजपासून कारखाने सुरू झाले. मात्र राज्य सरकारने जाचक अटी आणि त्रुटी घालून दिल्याने उद्योग चालवायचा कसा हा प्रश्न आमच्यापुढे आहे. तसेच आमच्या उद्योगाला आधारित कच्चामाल पुरवठा करणारे वाहतूक करणारे आणि इतर जिल्ह्यातील आमचे कर्मचारी याविषयी अनेक जाचक त्रुटी आणि अटी आमच्यासमोर ठेवल्या असल्याने आम्ही उद्योग कसा सुरु करायचा हा प्रश्न आमच्या समोर ठाकला आहे. तसेच बरेचशे कामगार आपापल्या गावी गेल्याने आमचा कारखाना केवळ एकाच शिफ्ट मध्ये चालवावा लागणार आहे त्यामुळे आमचे उद्दिष्टीत उत्पादन उत्पादित करणे शक्य नसल्याचे देखील अनेक उद्योजकांनी “न्यूज अनकट”शी बोलताना सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे