मराठवाड्यातून जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू, जलयुक्तचं जिल्हानिहाय रेकॉर्ड तपासणार

औरंगाबाद, १२ डिसेंबर २०२०: फडणवीस सरकार मध्ये जलयुक्त शिवार ही योजना सुरू करण्यात आली होती तसेच देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वकांक्षी योजना मानली जात होती. मात्र, या योजनेवर कॅग’नं ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगानं ही चौकशी होणार आहे. यासाठी ठाकरे सरकारनं काही दिवसांपूर्वीच चार सदस्यीय समितीची स्थापना केली होती. आता या योजनेतील गैरव्यवहारांची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातून ही चौकशी सुरू झाली असून त्यामुळं भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठवाड्यातील जलयुक्त शिवार कामाची जिल्हानिहाय चौकशी करण्यासाठी जलसंधारण आणि आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठवाड्यात ६ हजार २० गावांमध्ये जलयुक्तची कामं झाली होती. या योजनेचे काम सुरू असताना ठेकेदार व मजूर पुरवणाऱ्या संस्था यांनी व्यवहारांमध्ये मोठ्याप्रमाणावर घोळ केला असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात एकूण २ हजार ४१७ कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचं सांगत राज्य सरकारनं या योजनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार मराठवाड्यातील तब्बल पावणे दोन लाख कामं संशयाच्या भोवऱ्यात असल्यानं ही चौकशी होत आहे. जलसंधारण आणि आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची समिती जलयुक्तचं जिल्हानिहाय रेकॉर्ड तपासणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा