मुंबई : भारतीय नौदलातील ‘INS विराट’ या ऐतिहासिक विमानवाहू युद्धनौकेला खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र आहे.
एकेकाळी ‘द ग्रँड ओल्ड लेडी’ असे बिरूद मिरवणारे हे जहाज सेवानिवृत्त करण्यात आल्यानंतर ई-लिलावात कोणीही खरेदीदार मिळत नसल्याचे समोर आले आहे.
भारतीय नौदलाने विराट नौका सेवानिवृत्त केल्यानंतर तिला भंगारात विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा ई-लिलाव केला होता.
या युद्धनौकेला संग्रहालयात परावर्तीत करण्याच्या जुन्या योजनेअंतर्गतही कुणी खरेदीदार मिळाला नव्हता.
यापूर्वी राज्य सरकारने INS विराटचे कमर्शियल बिझनेस कॉप्लेक्समध्ये रुपांतर करण्याचा आपला प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे नोव्हेंबरमध्ये पाठवला होता.
परंतु, यात कुणीही रस दाखवला नसल्याने नंतर हि नौका भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘INS विराट’ हे जहाज भारतीय नौदल आणि रॉयल नेव्हीच्या सेवेत होते. १९८६ साली तत्कालीन काँग्रेस सरकारने HMS हार्मिसला ६.३ कोटी डॉलरमध्ये खरेदी करण्यासाठी ब्रिटनसोबत करार केला होता. HMS ची दुरुस्ती व नवीन उपकरणांच्या माध्यमातून ‘INS विराट’ हे जहाज साकारले गेले व भारतीय नौसेनेच्या ताफ्यात दाखल झाले.
दरम्यान, ‘INS विराट’ युद्धनौकेचे नाव जगातील सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे मोठे जहाज अशी गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे.