कोरोना सर्वेक्षणासाठी ग्रामपंचायतीने दिले आरोग्य केंद्रास तपासणी साहित्य…..

पुरंदर, दि. २२ जुलै २०२०: पुरंदर तालुक्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच कोरोना विषाणू आपल्या गावापासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या ग्रामपंचायतीच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आज प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने थर्मल तापमापक व ऑक्सिजन मापक देण्यात आलेला आहे. सरपंच दिव्या पवार आणि उपसरपंच विजय शिंदे यांनी हे साहित्य आशा स्वयंसेवक व आरोग्य सेवक यांच्या उपस्थितीत यांच्याकडे सुपूर्द केले.

कोरोना आजारा संदर्भात विविध उपाय योजना करण्यात नीरा ग्रामपंचायत सतत अग्रेसर राहिली आहे. नीरा शहरात प्रवेशाच्या ठिकाणी सॅनिटायझर कमान उभारणे, दररोज नीरा बाजारपेठेतून सॅनिटायझरची फवारणी करणे. गेली तीन महिने नीरा ग्रामपंचायत सातत्याने कोरोना विषाणूचा फैलाव गावांमध्ये होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहे. मागील काळात शहरात येणाऱ्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी हायस्कूल शाळेमध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा कोरोना विषाणूचा फैलाव गावात होऊ नये म्हणून सतत प्रयत्नशील असते.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून १० आशा स्वयंसेवक या दररोज गावातून सर्वेक्षणाचे काम करत असतात आशा स्वयंसेविका मार्फत गावात नागरिकांचे तापमान मोजणे व लोकांच्या शरीरातील ऑक्सिजन आणि पल्स मोजण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आज १० थर्मल मीटर व १० ऑक्सिमीटर प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले आहे. या माध्यमातून उद्यापासून दररोज एक आशा स्वयंसेविका किमान दोनशे लोकांच्या सर्वेक्षण करणार आहेत. या मध्ये ऑक्सिजन लेवल आणि तापमान तपासले जाणार आहे. त्यामुळे नीरा शहरात कोरोनाची साथ तात्काळ रोखण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याची माहिती आरोग्य सेवक गणेश जाधव यांनी येथे दिली.

यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण म्हणाले की, ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना विषाणूला अटकाव घालण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले.नीरा ही मोठी बाजारपेठ असली तरी आज पर्यंत आपण कोरोनाला नीरा शहरामध्ये प्रवेश करू दिला नाही. मात्र आता तालुकाभर कोरोनाचा मोठा फैलाव झाला आहे. दक्षता म्हणून आता इथून पुढे घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करणे गरजेचे होणार आहे. आणि म्हणूनच १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत मार्फत १० लेझर तापमापक आणि १० ऑक्सिमीटर प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले आहेत. त्या माध्यमातून रुग्णाचा शोध घेणे आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेवकांना सोपे जाणार आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, दिपक काकडे, गणपत लकडे, आरोग्य सहाय्यक शिवाजी चव्हाण उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा