आषाढी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना

पुणे,१३ मे २०२३ : आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा निर्मल आणि हरित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असेही ते यावेळी म्हणाले. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. निर्मल आणि हरित वारीवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. याच कालावधीत जी-२० परिषदेच्या बैठकीसाठी १५० पेक्षा अधिक प्रतिनिधी पुण्यात असणार आहेत. या प्रतिनिधींना राज्याच्या या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची माहिती देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करावी. जिल्हा परिषदांनी शौचालयाची सातत्याने स्वच्छता होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत

या सोहळ्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी तळावरील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही, तात्पुरती शौचालये आणि तात्पुरत्या स्नानगृहांची सुविधा करण्यात आली आहे. पालखीच्या स्वागताची तयारीदेखील करण्यात आली आहे. पालखी सोहळा कालावधीमध्ये पालखी मार्ग आणि पालखी तळावरील विविध सुविधांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

रस्ते दुरुस्ती, सपाटीकरण, अतिक्रमण काढणे, वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने वारीच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲप चा उपयोग करावा, असेही सौरभ राव यांनी सांगितले. वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही सौरभ राव यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा