मुंबई, 23 सप्टेंबर 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून कोणत्याही परिस्थितीत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सर्व विभागांनी मंजूर पदांचा तात्काळ आढावा घेऊन आपले मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे असे स्पष्ट निर्देश ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना दिले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला दुजोरा देत तातडीने ही कार्यवाही झाली पाहिजे असे सांगितले.
एमपीएससी आयोगाकडून महत्वाचा निर्णय
मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्यानं नैराश्यातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्य सरकारवर सर्व स्तरातून जोरदार हल्ला चढवण्यात आला होता. त्यामुळे अखेर दोन वर्षांनंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक या दोन ठिकणी मुलाखती घेतल्या जाणार आहे. 4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरदरम्यान या मुलाखती होणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राज्य शासनातील साडे पंधरा हजार पदांची भरती करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिला होता. त्यासाठी ‘एमपीएससी’ आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सातत्याने बैठका घेत, या भरती प्रक्रियेतील त्रुटी आणि अडचणी दूर करत त्याचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने केला. त्यामुळे या भरती प्रक्रियेला गती मिळाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे